परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी गुरुकार्याचे अनेक उत्तराधिकारी अप्रत्यक्षपणे नियुक्त केलेले असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

प.पू. श्री अनंतानंद साईश यांनी प.पू. बाबांना एकप्रकारे ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून नियुक्त केले. पुढे प.पू. बाबांनी भजनांच्या माध्यमातून गुरूंचे अध्यात्मप्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणावर केले. प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एकप्रकारे ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ नियुक्त केले. आता परात्पर गुरु डॉक्टर अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहेत. जगभर धर्मप्रसार होण्यासाठी कार्य करत आहेत आणि असे कार्य करणारे सहस्रो साधक घडवतही आहेत !

गुरु किंवा संत यांनी ‘कार्याचे उत्तराधिकारी’ म्हणून नियुक्त केल्यावर साधकांनी त्या कार्याचे दायित्व सांभाळण्याविषयी मनात शंका बाळगू नये !

परात्पर गुरु डॉक्टर किंवा सनातनचे संत काही वेळा साधकांना उद्देशून ‘आता हे साधक अमुक कार्य पाहू शकतील; त्यामुळे माझी काळजी मिटली !’, असे सांगतात. तेव्हा अशा काही साधकांना वाटते, ‘माझी या कार्यासाठी पात्रता नाही. मला हे सर्व जमेल का ?’ अशा साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.

पू. संदीप आळशी

१. गुरु जेव्हा साधकाला ‘कार्याचे उत्तराधिकारी’ म्हणून नियुक्त करतात, तेव्हा त्या साधकाला ते कार्य वाढवण्यासाठी आशीर्वाद आणि सामर्थ्यही प्रदान करतात.

२. खरे तर गुरूंनी ते कार्य सूक्ष्मातून आधीच केलेले असते. आता साधकांना त्या कार्यासाठी केवळ निमित्तमात्र व्हायचे असते.

३. देव जसा भक्ताच्या अधीन असतो, तसाच तो कार्याच्याही अधीन असतो. याचा अर्थ, साधकाकडून कार्य करवून घेण्यासाठी देव बाध्य असतो. देवाला ते कार्य साधकाकडून पूर्ण करवून घेण्यासाठी साधकाला सक्षम करावेच लागते. हे देवाचे कार्यच आहे !’

– (पू.) संदीप आळशी (३.२.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.