पुणे – दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘ऑफलाईन’ होणार आहेत, तसेच या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील, एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असून इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असतांना ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होतील. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली, तर ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी कोरोनाची लस बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. शाळा तिथे परीक्षा केंद्र असून बहिस्थ नाही, तर शाळेतील शिक्षकच ‘सुपरव्हायझर’ असतील.