उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला बालसाधक कु. मंत्र मच्छिंद्रनाथ म्हात्रे (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मंत्र म्हात्रे ही या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. मंत्र म्हात्रे याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ५५ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. मंत्र म्हात्रे

१. मावशीला आध्यात्मिक त्रास होत असतांना नामजप करणे

‘कु. मंत्र पाच वर्षांचा असतांना माझी बहीण कपिला हिला आध्यात्मिक त्रास होत होता. मंत्रने हे पाहिले, तेव्हा त्याने तिच्या शेजारी उभे राहून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप पुष्कळ वेळ केला. त्यानंतर माझ्या बहिणीचा त्रास न्यून झाला.

२. नामजप आतून करत असल्याचे सांगणे

मंत्र सहा वर्षांचा असतांना मला वाटायचे, ‘तो कधी नामजप करत नाही.’ तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने त्याला विचारले, ‘‘तू नामजप करतोस का ?’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मी आतून नामजप करतो.’’

३. विठ्ठलाला हार घालण्याची इच्छा देवानेच पूर्ण करणे

मंत्रला विठ्ठल पुष्कळ आवडतो. आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही त्याला शेजारी असणार्‍या विठ्ठल मंदिरात घेऊन गेलो होतो. तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मी विठ्ठल बाप्पाच्या गळ्यात हार घालणार.’’ आम्ही त्याला सांगितले, ‘‘तू लहान असल्याने तुझा हात पोचणार नाही. तुला हार घालता येणार नाही.’’ असे सांगितल्यावर तो शांत झाला. आम्ही मंदिराच्या गाभार्‍यात गेल्यावर तेथील पुजार्‍यांनी त्याला स्वतःहून उचलून घेतले आणि त्याने विठ्ठलाच्या गळ्यात हार घातला. देवानेच त्याची इच्छा पूर्ण केली.

सौ. दीपा म्हात्रे

४. परात्पर गुरुदेवांप्रती भाव

आम्ही रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी मंत्रने त्याच्या बहिणीला प.पू. गुरुदेवांना देण्यासाठी घरी चॉकलेट बनवायला सांगितले.

५. सेवेची आवड

अ. मंत्र माझ्यासह सत्संगाला यायचा आणि तेथे तो न कंटाळता २ – ३ घंटे बसायचा. तो सत्संगामधील बैठकांच्या घड्या घालायचा. तो माझ्यासह ग्रंथ प्रदर्शन कक्षावर सेवेला यायचा.

आ. आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यावर मंत्र स्वयंपाकघरातील सर्व साधकांना ‘मी काही सेवा करू शकतो का ?’, असे विचारायचा. तेव्हा एका साधिकेने त्याला पोळ्यांना तेल लावण्याची सेवा दिली.

६. आश्रमातील संतांचे चैतन्य ग्रहण करणे

आम्ही रामनाथी आश्रमात पू. सौरभ जोशीदादांच्या खोलीत गेल्यावर पू. दादांना मंत्रला पाहून पुष्कळ आनंद झाला होता. मंत्र त्यांच्यासह लपाछपी खेळत होता. तो त्यांच्या पलंगाखाली लपायचा. ‘तो पुष्कळ वेळ पलंगाखाली बसून पू. सौरभदादांचे चैतन्य ग्रहण करत होता’, असे जाणवत होते.’

– सौ. दीपा म्हात्रे (कु. मंत्रची आई), डोंबिवली, जिल्हा ठाणे.(१३.६.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.