१. व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा देतांना भ्रमणभाषमधून एक प्रकाशझोत आज्ञाचक्राकडे येऊन मन निर्विचार होणे आणि शरिरावरील आवरण दूर होऊन चैतन्य जाणवणे
‘७.६.२०२१ या दिवशी सकाळी मी माझ्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा देण्यासाठी बसलो होतो. माझा आढावा देऊन झाला होता. मी इतरांचे आढावे ऐकत असतांना पटलावर ठेवलेल्या माझ्या भ्रमणभाषमधून एक प्रकाशझोत माझ्या आज्ञाचक्राकडे आला आणि मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी सुखकर जाणीव व्हायला लागली. हळूहळू माझे मन निर्विचार झाले. सूर्यकिरण आल्यावर जसे धुके वितळत जाते, तसे माझ्या शरिरावरील त्रासदायक आवरण दूर होऊ लागले आणि मला स्वच्छ प्रकाश दिसू लागला.
२. साधकाचे शब्द भ्रमणभाषमधून न येता ते एका पोकळीतून ऐकू येत असल्याचे जाणवणे, पुढे पुढे शब्द ऐकू न येता केवळ ध्वनीलहरी ऐकू येणे, ही आनंदावस्था एक घंटा टिकणे
त्या वेळी ‘मी एका पोकळीत आहे’, असे मला जाणवले. ‘आढावा देत असलेल्या साधकाचे शब्द भ्रमणभाषमधून येत नसून ते एका पोकळीतून ऐकू येत आहेत’, असे मला जाणवले. मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. पुढे पुढे मला शब्द ऐकू न येता केवळ ध्वनींच्या लहरी ऐकू येत होत्या. ही माझी भावावस्था जवळजवळ १५ मिनिटे होती. त्यानंतरही १ घंटा माझी ही आनंदावस्था टिकली. गुरुमाऊलींनी मला ही अनुभूती दिल्याविषयी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर, (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
३. आढाव्याच्या वेळी प्रार्थना करतांना अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी प्रकाशाचा एक बोगदा दिसून त्यातून कुठेतरी चाललो असल्याचे दिसणे
‘७.६.२०२१ या दिवशी आई-बाबा यांच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा चालू होता. तेव्हा आम्ही सर्वजण प्रार्थना करत होतो. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून प्रार्थना करत असतांना मला त्यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी प्रकाशाचा एक बोगदा दिसू लागला. ‘त्या बोगद्यातून मी कुठेतरी चाललो आहे’, असे जाणवून मला पुष्कळ आनंद जाणवला.’
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |