धुळे, ३० जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांची स्वच्छता आणि पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच संपूर्ण ‘वन्देमातरम्’ म्हणण्यात आले. या वेळी दिलेल्या ‘भारतमाता की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमला.
या वेळी झालेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे म्हणाल्या, ‘‘आपली भारतभूमी चैतन्यदायिनी, पराक्रमाचा तेजस्वी वारसा लाभलेली आहे. याच भूमीत अनेक देवतांनी अवतार घेऊन असुरी वृत्तींचा नाश केला. याच भूमीमध्ये अनेक साधू-संत ऋषीमुनी यांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. याच भूमीत अनेक महापुरुषांनी परकीय आक्रमणे परतवून लावत मातृभूमीचे रक्षण केले. भारत हा संपूर्ण विश्वाचा ‘आध्यात्मिक गुरु’ असून ज्ञानाचे माहेरघर आहे. भारत देश स्वतंत्र होण्यासाठी क्रांतिकारक आणि महापुरुष यांनी सर्वस्वाचा त्याग करून दिले स्वतंत्र मिळवून दिले. तो वारसा त्यांनी आता आपल्या हाती सोपवला आहे. यापुढे या भारतभूमीला हिंदु राष्ट्र बनवून राष्ट्र अन् धर्म रक्षणाचे दायित्व आता आपल्या सर्वांवर आहे.’’
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सर्वश्री पियुष खंडेलवाल, मयुर बागुल, किशोरजी अग्रवाल, गौरव जाधव, गणेश माळी, तुषार कोंडे, गोपाल शर्मा, सचिन वैद्य, अमोल वानखेडे आदी राष्ट्राभिमानी उपस्थित होते.