उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. सान्वी राजेश चव्हाण ही या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
सौ. शर्वरी राजेश चव्हाण (चि. सान्वीची आई), वरळी, मुंबई.
१. जन्मापूर्वी
१ अ. पहिल्या मुलीच्या प्रसुतीच्या वेळी घडलेल्या प्रसंगांची भीती न वाटता नामजप सतत चालू असणे आणि ‘गर्भ नामजप ऐकत आहे’, असे जाणवणे : ‘माझ्या पहिल्या मुलीच्या प्रसुतीच्या वेळी मला कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले होते; मात्र या वेळी मला पूर्वी घडलेल्या प्रसंगांची भीती वाटत नव्हती. ‘देव या बाळाची काळजी नीट घेणार आहे’, असा मला विश्वास वाटत होता. गर्भारपणाच्या काळात मला नामजप करण्याची गोडी लागली होती. माझे नामस्मरण सतत चालू असायचे. मी बसून नामजप करतांना गर्भाची हालचाल जलद गतीने व्हायची. तेव्हा ‘गर्भ आनंदाने नाचत आहे आणि मी करत असलेला नामजप ऐकत आहे’, असे मला जाणवायचे.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते १ वर्ष
२ अ १. प्रसुतीच्या वेळी आधुनिक वैद्यांनी ‘देवाचे नाव घ्या’, असे सांगणे, त्या वेळी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर गोंडस आणि सोज्वळ बालिका जन्माला येणे : आधुनिक वैद्यांनी माझ्या प्रसुतीचा दिवस ठरवला. माझे शस्त्रकर्म होणार होते. मला ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये नेल्यावर मुख्य आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘तुम्ही महाराष्ट्रीयन आहात ना ? तुम्ही तुमच्या देवाचे नाव घ्या आणि कोणताही ताण घेऊ नका.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझा देवाप्रतीचा भाव वाढून मला रडू आले. मी सतत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. मी डोळे मिटल्यावर बाळाचा जन्म अनुभवत होते. बाळ जन्माला येतांना त्याच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली गेली होती; पण इतकी संकटे येऊनही गोंडस आणि सोज्वळ बालिका जन्माला आली.
२ अ २. बहिणीने मोठ्याने नामजप म्हटल्यावर एक दिवसाच्या बाळाने डोळे मोठे करून नामजप ऐकणे : त्या वेळी माझी मोठी बहीण (सौ. स्नेहल (प्रीती) गुरव) माझ्या समवेत २ दिवस होती. ती बालिकेला मोठ्याने नामजप म्हणून दाखवत असे. तेव्हा ती एक दिवसाची असूनही डोळे मोठे करून नामजप ऐकत असे. ती शांतपणे आणि एकटक मावशीकडे बघत रहायची. बालिकेला ‘तिची मावशी बोलत असलेले कळत आहे’, असे मला वाटले.
२ अ ३. सान्वी ३ – ४ मासांची असतांना देवाची गाणी ऐकल्यावर लगेच झोपायची.
२ अ ४. लहानपणी सान्वीला आध्यात्मिक त्रास असणे, आईने सान्वीसाठी नामजप केल्यावर त्रास उणावणे : तिला लहानपणी आध्यात्मिक त्रास होता. ती झोपेतून उठतांना विचित्र वागायची. ती हात-पाय आणि डोके जोराने भूमीवर आपटायची. ती डोळे मोठे करून आमच्याकडे (माझ्याकडे आणि तिच्या वडिलांकडे) रागाने बघायची. तिला घ्यायला गेल्यावर ती आम्हाला आवरत नसे. तिला होत असलेला त्रास पाहून मला पुष्कळ रडू यायचे. तेव्हा माझ्या बहिणीने (सौ. स्नेहल गुरव हिने) सांगितले, ‘‘देवावर विश्वास ठेव. तू देवालाच सर्व सांग. तू सान्वीसाठी नामस्मरण कर.’’ मी सान्वीसाठी बहिणीने सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर सान्वीचा त्रास उणावला.
२ आ. वय १ ते ५ वर्षे
२ आ १. साधनेची आवड
अ. ती थोडा वेळ नामस्मरण करते. तेव्हा ती म्हणते, ‘‘नामजप केल्यास आपल्या जवळ अनिष्ट शक्ती येत नाहीत. कृष्ण त्यांना दूर पळवून लावतो.’’
आ. एकदा सान्वीचे बाबा वहीत नामजप लिहित होते. तेव्हा सान्वीने बाबांना विचारले, ‘‘हा कोणता नामजप आहे ? तुम्ही माझ्या वहीत लिहून द्या. मी ते बघून लिहीन.’’ त्या वेळी तिला नीट लिहिताही येत नव्हते, तरीही तिने अतिशय सुंदर अक्षरांत नामजप लिहिला.
२ आ २. श्रीकृष्णाप्रती भाव
२ आ २ अ. तिला देवाची भजने ऐकायला पुष्कळ आवडतात. ती भजने सुरात आणि भावपूर्ण म्हणण्याचा प्रयत्न करते.
२ आ २ आ. ‘श्रीकृष्ण माझा मित्र आहे’, असे सांगणारी सान्वी ! : सान्वी नेहमी म्हणते, ‘‘मला श्रीकृष्ण पुष्कळ आवडतो. तो माझा मित्र आहे.’’ तिला काही लागले किंवा बरे वाटत नसेल, तर ती लगेच कृष्णाला सांगते. तिला बरे वाटल्यावर ती म्हणते, ‘‘बघ, माझ्या कृष्णाने मला बरे केले.’’
२ आ २ इ. अपघात झाल्यावर ‘श्रीकृष्णाने वाचवले’, असे सांगणे : एकदा आम्ही (मी, यजमान आणि सान्वी) बाहेर गेलो होतो. माझे काम झाल्यावर मी दुचाकीवर बसल्यावर ज्या बाजूने गाड्या येत होत्या, त्याच बाजूला दुचाकी कलंडली. आम्ही तिघेही तोल जाऊन मार्गात पडलो. त्या वेळी आमच्या मागून येणार्या गाड्या थांबल्या नसत्या, तर अघटित घडले असते. तेव्हा आम्हाला पुष्कळ भीती वाटत होती; पण सान्वी पटकन म्हणाली, ‘‘कृष्णानेच आपल्याला वाचवले.’’ तेव्हा मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. आम्ही घरी गेल्यावर तिच्या मावशीने तिला विचारले, ‘‘तुला भीती नाही का वाटली ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला भीती वाटली नाही. कृष्णानेच आम्हाला वाचवले.’’
२ आ ३. सान्वीची स्वभावदोषांच्या निर्मूलनाविषयी सतर्कता : एकदा मी वहीत माझ्याकडून झालेल्या चुका लिहित होते. तेव्हा आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.
सान्वी : आई, तू काय लिहित आहेस ?
मी : माझ्याकडून झालेल्या चुका लिहित आहे.
सान्वी : तुला माझ्यामुळेच राग अधिक येतो. मी चुका न्यून करण्याच्या प्रयत्न करीन. मलाही माझ्या चुका लिहिण्यासाठी वही दे.
मी : अगं, तू पुष्कळ लहान आहेस. तुला अजून लिहिताही येत नाही.
सान्वी : तू मला सांग. मग मी लिहीन.
तेव्हा मला गुरुमाऊलींप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. मला वाटले, ‘मी वयाच्या ४२ व्या वर्षी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकत आहे, तर सान्वी इतकी लहान असून तिला त्याविषयी जिज्ञासा आहे.
३. स्वभावदोष
हट्टीपणा, विनाकारण रडणे आणि आवड-नावड जपणे.’
समंजस आणि बालवयातच श्रीकृष्णाप्रती भाव असणारी वरळी (मुंबई) येथील चि. सान्वी राजेश चव्हाण (वय ५ वर्षे) !
चि. सान्वी राजेश चव्हाण हिची तिच्या मावस बहिणींना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. संस्कृती गुरव (मावस बहीण) (वय १८ वर्षे), परळ, मुंबई.
१. बालवयातच देवतांची चित्रे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र ओळखणे : ‘सान्वी ८ मासांची असतांना आमच्या घरी आल्यावर तिला आजीने विचारले, ‘‘मारुतीरायाचे चित्र कुठे आहे ?’’ तेव्हा तिने ज्या भिंतीवर ते चित्र आहे, तेथे बघून नमस्कार केला. आजीने तिला ‘परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर ज्या पटलावर त्यांचे छायाचित्र ठेवले आहे, त्या पटलाकडे सान्वीने बोट दाखवले. तिला ‘बाप्पाला नमो कर’, असे म्हटल्यावर तिने लगेच हात जोडून नमस्कार केला.
२. समंजस : सान्वी ३ वर्षांची असतांना एकदा आमच्याकडे आली असतांना तिने एक चित्र काढले. ती ते चित्र माझ्या आईला (सौ. स्नेहल गुरव हिला, तिच्या मावशीला) दाखवायला दुसर्या खोलीत गेली. तेव्हा आई सेवेत व्यस्त होती. सान्वीने मावशीला त्रास न देता तिला दूर अंतरावरून चित्र दाखवले. नंतर ती मला म्हणाली, ‘‘मोठी मावशी सेवा करत आहे. मी तिला चित्र नंतर दाखवते.’’
३. आश्रमात जाण्याची ओढ : सान्वी ३ वर्षांची असतांना आमच्या समवेत रामनाथी आश्रमात आली होती. माझी मोठी बहीण, कु. वैष्णवी गुरव आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करते. आश्रमातून घरी आल्यापासून सान्वी मधूनमधून तिच्या बाबांना सांगते, ‘‘मला वैष्णवीताईच्या आश्रमात जायचे आहे.’’ तेव्हा तिचे बाबा म्हणाले, ‘‘तू पुष्कळ रागावतेस. आश्रमात असे चालत नाही.’’ तेव्हा ती बाबांना म्हणाली, ‘‘मी आश्रमात गेले की, माझा राग आपोआप न्यून होईल.’’
४. बालपणापासून कृष्णाची ओढ : सान्वीला बालपणापासूनच कृष्णाची ओढ आहे. तिची आई तिला ओरडली किंवा तिला कुणी घाबरवल्यावर ती म्हणायची, ‘‘कृष्णा, बघ ना हे मला घाबरवतात.’’ तिच्या शाळेत गोकुळाष्टमीच्या दिवशी काही मुले कृष्ण आणि काही मुले राधा बनून जाणार होती. तेव्हा तिची आई तिला म्हणाली, ‘‘तू राधा हो.’’ तेव्हा ती आईला म्हणाली, ‘‘मला कृष्ण बनायचे आहे.’’ ती कृष्णाची वेशभूषा करून शाळेत गेली. तिचे ते सुंदर रूप शाळेतील बाईंना पुष्कळ आवडले. बाईंनी तिच्याकडून दहीहंडीच्या सर्व कृती करवून घेतल्या.
५. सात्त्विक वेशभूषा करणे : तिच्या शाळेत मुलांना सणाच्या वेळी सात्त्विक पोषाख घालायला सांगतात. तिला ६ आणि ९ वारी साडी नेसायला पुष्कळ आवडते. आषाढी एकादशीला ती ९ वारी साडी नेसून डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सहभागी होते.
६. भजने आवडणे : तिला गायला आणि नृत्य करायला पुष्कळ आवडते. तिला ‘सत्गुरु मिले मोहे, सारे दुःख बिसरे, अंतर के पट खुल गयो रे ।।’ हे भजन आवडते. एकदा आम्ही सहलीला जातांना माझ्या मामाने भ्रमणभाषवर ते भजन लावले. त्या वेळी अन्य मुलांचा पुष्कळ गोंधळ चालू होता; पण सान्वी माझ्या आईच्या समोर उभी राहून सुरात सूर मिसळून गात होती. तिचे मुलांच्या गोंधळाकडे काहीच लक्ष नव्हते.
७. आज्ञापालन करणे : दळणवळण बंदीच्या काळात सान्वी पुणे येथे मावशीकडे गेली होती. माझ्या आईने सान्वीला तिच्या मावस भावंडांना नामजप करायला सांगून प्रतिदिन त्याचा आढावा द्यायला सांगितला. त्यानुसार सान्वी आईला नामजप केल्याचा आढावा देत होती.’
कु. वैष्णवी गुरव (मावस बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘मावस बहिणीला बरे वाटावे’, यासाठी श्रीकृष्णाला प्रार्थना करणे : ‘एकदा माझी बहीण संस्कृती रुग्णाईत होती. सान्वी तिला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा ती आमच्याकडे २ दिवस राहिली होती. ती श्रीकृष्णाच्या चित्रासमोर डोळे बंद करून २ – ३ मिनिटे प्रार्थना करत होती. तेव्हा मी तिला विचारले, ‘‘तू इतका वेळ काय प्रार्थना केलीस ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘संस्कृतीताई लवकर बरी होऊ दे’, असे मी कृष्णाला सांगितले.’’
२. गुरुपादुकांचे शांतपणे दर्शन घेणे आणि संतांच्या मांडीवर बसल्यावर आनंद होणे : एकदा आम्ही सेवाकेंद्रात गुरुपादुकांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सान्वी एका ठिकाणी शांतपणे बसून गुरुपादुकांकडे बघत होती. ती सद्गुरु अनुताईंना (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना) भेटल्यावर ती त्यांच्या मांडीवर बसली. तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला होता.
३. गणपतीच्या मंदिरात गेल्यावर गणपतीचे गाणे म्हणणे, ते ऐकल्यावर सर्वांची भावजागृती होणे : एकदा आम्ही सर्व कुटुंबीय अलिबाग येथे गेलो होतो. तेव्हा आम्ही गणपतीच्या मंदिरात गेल्यावर सान्वी आणि तिची बहीण यांनी गणपतिविषयी गाणे गायले. त्या गाणे गात असतांना केवळ गणपतीच्या मूर्तीकडे बघत होत्या. त्यांच्या गाण्याने सर्वांची भावजागृती झाली.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २१.५.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.