गाय वाचवली, तर देश वाचेल ! – राजेंद्र लुंकड, गोविज्ञान संशोधन संस्था

पुणे – लोक गायी आणि गो उत्पादने यांकडे आकर्षित झाले पाहिजेत. गाय वाचवली, तर देश वाचेल, हा आमचा विश्वास आहे, असे मत गोविज्ञान संशोधन संस्थेचे राजेंद्र लुंकड यांनी व्यक्त केले. राजेंद्र लुंकड हे गेली अनेक दशके गोसेवा करत आहेत. संपूर्ण भारतभर गो विज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्नशील असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आशीर्वादाने गोविज्ञान संशोधन संस्थेचे काम त्यांनी चालू केले.

श्री. राजेंद्र लुंकड

त्यांनी आधी पंचगव्य औषधे विकायला प्रारंभ केला. मुंबई, नागपूर आणि अकोला येथे सिद्ध केलेली औषधे विकण्यासह त्यांनी तेथे रुग्णालयही चालू केले. रासायनिक खतांचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना सांगून गोमूत्र आणि शेण यांच्या आधारे म्हणजेच गायीवर आधारित शेती अन् सेंद्रिय शेती करण्यास शिकवले. सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या ताज्या भाज्यांमधून प्रतिदिन सहस्रोंचा लाभ कसा करून घ्यावा, याविषयी त्यांचे प्रबोधन केले, तसेच इतर गो उत्पादनांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले.

श्री. राजेंद्र लुंकड असेही म्हणाले की, ” कसायांकडून गायी विकत घेऊ नका. त्यांना पैसे देऊ नका. त्या ऐवजी गायींना, गोवंशांना पोलिसात द्या. शेतकऱ्यांकडून गोवंश विकत घेऊन जमत असल्यास ते गोवंश स्वतः सांभाळा, अथवा जवळच्या गोशाळेत द्या. गोभक्त, गोरक्षक यांच्या कुटुंबाचेही संरक्षण व्हावे यासाठी स्थानिक दानधर्म करणाऱ्या व्यक्तींकडून त्या गोरक्षकांच्या कुटुंबांचा सुरक्षा विमा करवून घ्या.”