नागपूर आणि मुंबई येथे नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन !

नागपूर – ‘ज्याची बायको पळून जाते त्याचेच नाव मोदी ठेवले जाते’, असे  विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजप प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे आंदोलन करत ‘पटोले यांना वेड्यांच्या रुग्णालयात भरती करा’, अशी मागणी करणारे पत्र सोनिया गांधी यांना पाठवणार आहे, असे सांगितले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरातील छापरूनगर चौक आणि सीए रस्ता येथे नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोपर्यंत क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत पटोले यांच्या विरोधात अशी वेगवेगळी निषेध आंदोलने चालूच रहातील, असे त्यांनी या वेळी सांगितले.

पत्रकारांशी बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पटोले मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करत आहेत. त्यांना आम्ही बांगड्यांचा आहेर देणार असून संपूर्ण राज्यात त्यांचे पुतळे जाळण्यात येतील. पटोले यांनी असे वक्तव्य करून ५० कोटी महिलांचा अवमान केला आहे. मुंबईतील दादर येथे मुंबई भाजप प्रदेश कार्यालय येथे भाजपच्या कार्यकर्र्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन केले. पटोले यांच्या विरोधात राज्यात सर्वत्रच्या पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट करण्यात येतील, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.