राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश !
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पहाणी करण्यात येणार आहे. यापूर्वी आयोगाने केलेल्या पहाणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आता पुन्हा पहाणी करण्यात येईल अन् त्या वेळी त्रुटी निघाल्यास त्यांची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात येईल. महाविद्यालय होण्यास लागणारा विलंब लक्षात घेता तूर्तास हे महाविद्यालय होण्यात अनिश्चितता निर्माण झाली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे…
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. लोकांच्या मागणीनुसार याला राज्य सरकारने संमती देत आवश्यक प्रशासकीय, तसेच आर्थिक तरतुदी केल्या. १०० विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय यावर्षी चालू होणे अपेक्षित होते; मात्र महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता मिळावी, यासाठी आतापर्यंत आयोगाने केलेल्या पहाणीतील त्रुटींची पूर्तता करण्यात प्रशासनाकडून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत.
२. महाविद्यालयासाठी वर्गखोल्या, प्रयोगशाळा, फर्निचर, वाचनालय आदींमधील त्रुटी, पुरेशा अध्यापक वर्गाची कमतरता, आदी त्रुटी दाखवत २१ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रथम मान्यता नाकारण्यात आली. याची पूर्तता करून सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून पुन्हा अहवाल पाठवण्यात आला.
(सौजन्य : TV9 Marathi)
३. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आयोगाकडून पुन्हा ऑनलाईन पहाणी करण्यात आली. या वेळी आवश्यक अध्यापक आणि कर्मचारी यांची पूर्ण पूर्तता केल्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यानुसार ‘व्हिडिओ’द्वारे आयोगाने कर्मचारी दाखवण्यास सांगितले असता ‘डिन’ (अधिष्ठाता) वगळता एकही कर्मचारी महाविद्यालय प्रशासन दाखवू शकले नाही. तसेच प्रयोगशाळाही अपूर्ण असल्यामुळे पुन्हा मान्यता नाकारण्यात आली.
४. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या विनंतीवरून पुन्हा २१ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ऑनलाईन पहाणी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयासाठी इमारतीचे बांधकाम चालू असल्याचे सांगण्यात आले; मात्र महाविद्यालय प्रशासन तेही दाखवू शकले नाही. त्यानुसार तीनही पहाणींचा एकत्रित अहवाल २५ ऑक्टोबरला दिल्यानंतर एकूण त्रुटींचा विचार करता पुन्हा मान्यता नाकारण्यात आली.
५. या निर्णयाविरुद्ध महाविद्यालय प्रशासनाने The Nursing and Midwifery Council कडे (एन्.एम्.सी.कडे) १ नोव्हेंबर २०२१ या दिवशी अपिल केले. यावर १२ नोव्हेंबरला पुन्हा ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. यावरचा निर्णय २३ नोव्हेंबरला कळवून त्रुटींची पूर्तता न झाल्याने पुन्हा मान्यता नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच ‘त्रुटींची पूर्तता करून सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी २०२२-२३ या नव्या वर्षासाठी नव्याने मागणी करावी’, असे आयोगाकडून सांगण्यात आले.
६. या निर्णयावर सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून २ डिसेंबरला केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे अपिल करण्यात आले. यात एन्.एम्.सी.ने दाखवलेल्या त्रुटींची पूर्तता केल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा लवकरच यासाठी निरीक्षण होण्याची शक्यता आहे.