जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्या पत्नीला धर्मांधांकडून घरात घुसून मारहाण

धर्मांध पोलीस निरीक्षकाकडून धर्मांधांना साहाय्य !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! आता सरकारने अशा धर्मांधांवर कठोर कारवाई करून त्यांना साहाय्य करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला नोकरीवरून काढून कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक

जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत कथित आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी अटकेत असलेले जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला काही धर्मांधांनी मारहाण करून घरातून बाहेर काढल्याची घटना घडल्याची माहिती त्यागी यांनी दिली. या मारहाणीला साहाय्यक पोलीस निरीक्षक झैदी यांनी साहाय्य केल्याचा आरोप त्यागी यांच्या पत्नीने केला आहे.

जितेंद्र त्यागी यांची पत्नी फरहा फातिमा यांनी या घटनेविषयी माहिती देतांना सांगितले की, २० जानेवारी या दिवशी सायंकाळी अचानक शमील शम्सी, मीसम रिझवी, शबाब असगर, अब्बास नकी हुसैन, गुलशन अब्बास, शहजाद, कियान रिझवी फैजी आणि सलमान माझ्या घरात घुसले आणि माझी मामेबहिण निदा हिला शिवीगाळ करू लागले. या वेळी मी त्वरित सआदतगंज पोलीस ठाण्यात दूरभाष करून घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यानंतरही आरोपींनी मला धक्काबुक्की, तसेच शिवीगाळ केली. घटनेच्या वेळी पोलीस निरीक्षक झैदी उपस्थित होते; मात्र ते मूकदर्शक होते. झैदी यांनीच माझ्याकडून घराच्या कुलुपाची किल्ली घेतली आणि धर्मांधांनी आम्हाला घरातून बाहेर काढले.