‘इंडिया गेट’वरील ‘अमर जवान ज्योती’ राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन !

नवी देहली – राजधानी देहलीतील ‘इंडिया गेट’वरील ‘अमर जवान ज्योती’ २१ जानेवारी या दिवशी येथूनच जवळ असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. अमर जवान ज्योतीची मशाल दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात आणली गेल्यानंतर एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण यांच्या हस्ते ती येथील ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. अमर जवान ज्योती स्मारक वर्ष १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात हुतात्मा झालेल्या ३ सहस्र ८४३ भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते. येथे प्रथम वर्ष १९७२ मध्ये ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. २६ फेब्रुवारी १९७२ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते.

केंद्रातील भाजप सरकारने वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले. वर्ष १९४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या २६ सहस्र ४६६ भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ हे बांधण्यात आले आहे.

इंडिया गेटचा इतिहास !

इंडिया गेट

४२ मीटर उंचीचा ‘इंडिया गेट’ ब्रिटीश सरकारने बांधला होता. वर्ष १९१४ ते १९२१ मधील पहिल्या महायुद्धात आणि तिसर्‍या अफगाण युद्धात ब्रिटिश सैन्यातील हुतात्मा झालेल्या ८४ सहस्र भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने हे बांधले होते. त्यावर त्या सैनिकांची नावेही कोरलेली आहेत.