श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. भक्त प्रल्हादासारखी खडतर साधना करणारा साधकच या आपत्काळात जिवंत राहील !

‘आपत्काळाची तीव्रता आता इतकी वाढत चालली आहे की, जे देवाचे खरे भक्त असतील, तेच या कठीण काळात टिकाव धरू शकतील. देवाने आता अशी चाळण लावली आहे की, ‘जे समष्टीचा विचार करून साधना करतील आणि ज्यांची देवावर पूर्ण श्रद्धा असेल, त्यांनाच तो पुढे घेऊन जाणार आहे. नाहीतर, आता ‘सुक्यासह ओलेही जळते’, या उक्तीप्रमाणे कधीतरी छंद म्हणून थोडीशी साधना करणारे, कधीतरी देवाचा एक माळ जप करणारे, कधीतरी सायंकाळी देवाचे स्तोत्र म्हणणारे; उपवास, व्रते करणे, देवदर्शनाला जाणे, यांसारख्या कर्मकांडयुक्त कृती करणारे, असे सगळे जण या आपत्काळात भरडले जातील. आता तीव्र साधना करणे आवश्यक आहे. दिवसभर देवाच्या अखंड अनुसंधानात असणारे, तन, मन आणि धन यांचा त्याग करून कायमस्वरूपी राष्ट्र अन् धर्म यांच्या उत्थापनासाठी झटणारे, निःस्वार्थ सेवेचा ध्यास घेतलेले, अखंड सेवारत असलेले साधकच आता पुढे टिकतील. आता देव एवढ्याच लोकांना घेऊन रामराज्याची स्थापना करील. त्यामुळे ‘आम्ही देवाचा एक माळ जप करतो, तर देव आमचे रक्षण करीलच’, या भ्रमात कुणीही राहू नये; कारण आता भक्त प्रल्हादासारखी खडतर साधना करण्याची वेळ जवळ आली आहे.

२. ‘सेवेचे दायित्व घेणे, म्हणजे काय ?’, याची जाणीव होण्यासाठी मनाला पुढील प्रश्न विचारणे आवश्यक !

‘देवाने माझ्यावर सेवेचे दायित्व दिले आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून सेवा होत आहे ना ? मी देवाला अपेक्षित अशी सेवा करत आहे ना ? ‘सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळून सेवेच्या माध्यमातून साधनेचे ध्येय गाठणे’, या अनुषंगाने माझी सेवा चालू आहे ना ? ‘ही सेवा मला गुरूंच्या कृपेने मिळाली आहे’, याची सतत जाणीव ठेवून मी सेवेतून आनंद मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे ना ? सेवेच्या दायित्वाचे गांभीर्य लक्षात ठेवून मी सेवा परिपूर्ण होण्यासाठी तळमळीने प्रयत्नशील आहे ना ?’, इत्यादी प्रश्न मनाला विचारत राहिले की, सेवेप्रती गांभीर्य वाढून आपल्याला आपल्या दायित्वाची जाणीव होऊ लागते.

‘साधकाची सेवा परिपूर्ण होऊन त्यातून त्याची साधनाही व्हावी’, याचे खरे दायित्व आपल्या गुरूंनीच घेतलेले असते. साधकांनी सेवा करण्यामागे गुरूंच्या संकल्पशक्तीचे बळ कार्यरत असते. यामुळे गुरुचरणांना स्मरून तन्मयतेने सेवा केली की, साधकाच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढते.

३. आपल्यातील गुण ओळखून त्यांचा ईश्वराच्या सेवेत योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे !

देवाने प्रत्येकाला काहीतरी चांगले गुण दिलेले असतात. स्वतःमधील त्या दैवी गुणांना ओळखून त्यांचे संवर्धन करायला हवे. या गुणांचा देवाची सेवा, समष्टी सेवा आणि गुरुकार्य करणे यांसाठी लाभ करून घेता आला पाहिजे, तरच ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या या गुणांचे सार्थक झाल्यासारखे होईल. गुणसंवर्धनाने आपल्यातील साधनेचा उत्साह वाढल्याने मन अधिकाधिक सकारात्मक बनते. मनोबळ वाढले की, सेवाही चांगली अन् भावपूर्ण होऊ लागते आणि मगच साधनेतील खरा आनंद मिळू लागतो.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, तिरुवण्णमलई, तमिळनाडू. (१८.४.२०२०)