सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ९.७.२०२० या दिवशी केलेल्या कर्नाटक राज्यातील दैवी दौर्‍याचा वृत्तांत !

‘मार्च २०२० पासून संपूर्ण भारतात ‘कोरोना’ महामारीमुळे सगळेच त्रस्त होऊ लागले. १ जून २०२० या दिवशी दळणवळण बंदीचे नियम काही प्रमाणात शिथिल झाले. त्यानंतर सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तीर्थक्षेत्रांना जाऊन तेथे सर्व साधकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी.’’ त्यानुसार ३.६.२०२० या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दैवी प्रवासाला आरंभ झाला. गुरुपौर्णिमा, ५.७.२०२० या दिवसानंतर सप्तर्षींनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना कर्नाटक राज्यातील काही मंदिरांत दर्शनाला जायला सांगितले. सप्तर्षींनी सांगितल्यानुसार हा दैवी प्रवास करतांना घडलेल्या घटना आपण जाणून घेऊया.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

९.७.२०२० या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेले कटीलू येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर, धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथेश्वर मंदिर आणि उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

१. श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर,कटीलू, दक्षिण कन्नड, कर्नाटक.

१ अ. श्री दुर्गापरमेश्वरी मंदिराचा इतिहास : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नंदिनी नदीच्या काठी ‘कटीलू’ या नावाचे गाव आहे. नंदिनी नदीच्या मध्यभागी एका खडकावर श्री दुर्गापरमेश्वरी देवीचे मंदिर आहे. सप्तर्षींनी केलेल्या प्रार्थनेनुसार ‘अरुणासुरा’चा वध करण्यासाठी आदिशक्ती जगदंबेने भ्रमराचे (भुंग्याचे) रूप धारण केले. नंदिनी नदीच्या मध्यभागी एका मोठ्या दगडावर देवीने अरुणासुराचा वध केला. तो दगड आजही पहायला मिळतो. त्याला ‘रक्तेश्वरी दगड’, असे म्हटले जाते.

भुंग्याच्या रूपात असलेल्या देवीचे रूप रौद्र होते. सप्तर्षींनी तिला सौम्य रूप धारण करण्याची प्रार्थना केली. त्यावर देवीने ‘दुर्गा परमेश्वरी’ हे तारक रूप धारण केले. एका शिवलिंगाच्या रूपात देवी या ठिकाणी अंतर्धान झाली.

१ आ. वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी : श्री दुर्गापरमेश्वरी मंदिराचे प्रधान अर्चक आणि प्रमुख विश्वस्त श्री. अस्रण्णा यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत’, असे स्थानिक साधकांनी सांगितल्यावर त्यांनी दर्शनासाठी विशेष सोय केली. देवदर्शन झाल्यावर श्री. अस्रण्णा यांना भेटल्यावर त्यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवीचे वस्त्र, बांगड्या आणि कुंकू प्रसाद म्हणून दिले. या वेळी श्री. अस्रण्णा म्हणाले, ‘‘माताजी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हाती घेतलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होवो’, अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. विजयी भव !’

कटीलू येथे श्री दुर्गापरमेश्वरी देवीने अरुणासुराचा वध केलेला रक्तेश्वरी दगड आणि समोर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

२. श्री मंजुनाथेश्वर मंदिर,धर्मस्थळ, दक्षिण कन्नड, कर्नाटक.

२ अ. धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथेश्वर मंदिराचा इतिहास : अनुमाने ८०० वर्षांपूर्वी अण्णप्पा स्वामी नावाच्या एका शिवभक्ताने धर्मस्थळ येथे शिवलिंगाची स्थापना केली. त्याला ‘मंजुनाथेश्वर’ असे नाव पडले. गेल्या ३०० वर्षांपासून धर्मस्थळ येथील जैन पंथीय हेग्गडे परिवार या मंदिराचे धर्मकर्ता आहेत. प्रस्तुत हेग्गडे परिवाराचे प्रमुख श्री. वीरेंद्र हेग्गडे हे धर्मस्थळाचे धर्माधिकारी म्हणून ओळखले जातात. गेल्या १०० वर्षांत कर्नाटक आणि दक्षिण भारतातील अनेक भाविकांना धर्मस्थळ श्री मंजुनाथेश्वराविषयी आलेल्या शेकडो अनुभूतींमुळे हे क्षेत्र आता प्रसिद्ध झाले आहे.

२ आ. वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

२ आ १. धर्मस्थळाचे धर्माधिकारी श्री. वीरेंद्र हेग्गडे यांची भेट होणे : या वेळी धर्मस्थळ श्री मंजुनाथेश्वर मंदिराचे धर्माधिकारी श्री. वीरेंद्र हेग्गडे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भेटले. श्री. वीरेंद्र हेग्गडे म्हणाले, ‘‘डॉ. आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचे कार्य आणि सनातन पंचांग पुष्कळ छान आहे. गेल्या २० वर्षांपासून सनातन संस्थेचे साधक मला भेटतात आणि ग्रंथ अन् सनातन पंचांग देतात. सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही मंदिराच्या वतीने सोय करतो. सनातन संस्थेच्या कार्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. माताजी, तुम्ही आज येथे आलाच आहात, तर आमचे अन्नछत्र बघावे. तुम्हाला सर्व माहिती देण्यासाठी मी व्यवस्थापकांना सांगतो.’’ यानंतर धर्माधिकारी श्री. वीरेंद्र हेग्गडे यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान केला. त्यांच्या अन्नछत्र व्यवस्थापकांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना संपूर्ण अन्नछत्र दाखवले. गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून धर्मस्थळ येथे अन्नदान होत आहे. प्रत्येक दिवशी ७० सहस्र भाविकांना अन्नदान करण्यात येते.

२ आ २. धर्मस्थळाचे ग्रामीण रोजगार योजनेचे प्रादेशिक निर्देशक श्री. धर्मराय नेल्लीताय यांची भेट होणे : ‘ग्रामीण भागातील लोकांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे’, यासाठी ग्रामीण रोजगार योजना राबवण्यात येते. या ग्रामीण रोजगार योजनेचे प्रादेशिक निर्देशक श्री. धर्मराय नेल्लीताय गेल्या काही वर्षांपासून सनातन संस्थेच्या कार्यात हितचिंतक म्हणून सहभागी होत आहेत. त्यांना स्थानिक साधकांकडून ‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ धर्मस्थळ येथे आल्या आहेत’, असे कळल्यानंतर त्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री. नेल्लीताय यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेल्या. तेव्हा श्री. धर्मराय नेल्लीताय यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले, ‘‘येणार्‍या काळात मी साधकांना आयुर्वेदीय वनौषधींची माहिती आणि लागवडीविषयी प्रशिक्षण देऊ शकतो.’’ श्री. नेल्लीताय यांच्या मार्गदर्शनानुसार ३५ सहस्र लोक विविध ग्रामीण भागांत काम करत आहेत. श्री. धर्मराय नेल्लीताय हे धर्मस्थळ येथील श्री धर्मस्थळ मंजुनाथेश्वर आयुर्वेद महाविद्यालयाच्या अंतर्गत होणारे कार्यही पहातात.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सन्मान करतांना धर्मस्थळाचे धर्माधिकारी श्री. वीरेंद्र हेग्गडे

३. श्रीकृष्ण मंदिर, श्रीकृष्ण मठ, उडुपी, कर्नाटक.

३ अ. उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिराचा इतिहास : १३ व्या शतकात द्वैत सिद्धांताचे जनक श्री मध्वाचार्य यांना उडुपी येथे गोपीचंदनाच्या मोठ्या साठ्यात श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती सापडली. ‘हे ईश्वरी नियोजन आहे’, असे जाणून मध्वाचार्यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि एक सुंदर मंदिर स्थापन केले. हेच आताचे उडुपी येथील ‘श्रीकृष्ण मंदिर.’ श्रीकृष्णाची मूर्ती पूर्वाभिमुख होती. १६ व्या शतकात कनकदास नावाचे संत मंदिरात दर्शनासाठी आले. ते धनगर जमातीचे होते. मंदिराच्या पुजार्‍यांना वाटले, ‘ही एक सामान्य व्यक्ती आहे.’ पुजार्‍यांनी कनकदास यांना श्रीकृष्णाच्या मंदिरात जायला अनुमती नाकारली. कनकदासांनी मंदिराच्या मागच्या बाजूला (पश्चिमेला) जाऊन श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याची स्तुती केली. कनकदासाच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले.

तेव्हा पूर्वाभिमुख असलेली मूर्ती पश्चिमेला वळली. मंदिराच्या आवारात छोटा भूकंप झाला आणि पश्चिमेकडील भिंतीला भोक पडले. त्यातून कनकदासांना श्रीकृष्णाचे दर्शन घेता आले. आता त्या ठिकाणी एक खिडकी बसवली आहे. ज्याला ‘कनकन किंडी’ म्हणजे ‘कनकाची खिडकी’, असे म्हटले जाते. मंदिराच्या आतल्या भागात गाभार्‍याच्या भोवती एक भिंत आहे. त्यालाही एक खिडकी करण्यात आली आहे, ज्याला ‘नवग्रह किंडी’ म्हणजे ‘नवग्रह खिडकी’, असे म्हणतात.

श्री. विनायक शानभाग

३ आ. वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

१. ‘कोरोना’ महामारीमुळे भारतात दळणवळण बंदी असल्याने श्रीकृष्णाच्या मंदिरात जायला सर्वांना अनुमती नाही. सर्वांना बाहेरून, म्हणजे ‘कनकाच्या खिडकीतून’ श्रीकृष्णाचे दर्शन मिळते. मंदिराच्या व्यवस्थापकांना सांगितल्यावर त्यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दर्शनाची अनुमती दिली.

२. श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडतांना आम्ही मंदिराच्या गोशाळेच्या बाजूने जात होतो. तेव्हा गोपालकाने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आत यायला सांगितले. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ गोशाळेच्या आत गेल्यावर ‘श्रीकृष्ण’ नावाच्या बैलाने शेण दिले आणि मोठ्याने हुंकार दिला. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या बैलाला गूळ खायला दिला.

३ इ. उडुपी येथील श्रीकृष्णाचे दर्शन घेतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेली अनुभूती

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ४५ मिनिटे श्रीकृष्णाचे अत्यंत जवळून दर्शन घेता आले. नंतर श्रीकृष्णाच्या सायंपूजेत सहभागी होता आले. श्रीकृष्णाचे दर्शन घेत असतांना त्यांना श्रीकृष्णाचे अलंकार अत्यंत प्रकाशमान दिसत होते. या वेळी त्यांनी निर्विचार स्थिती अनुभवली आणि त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मुल्की, कर्नाटक. (९.७.२०२०)