काँग्रेसप्रमाणे शिवसेनेने मुसलमानांचे लांगूलचालन करू नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
हिंगोली – औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी प्रभाग क्रमांक ३ मधील एका मौलानाच्या नातेवाइकास निवडून देण्याचे आवाहन करत असतांना त्यांनी १६ जानेवारी या दिवशी भर सभेत मौलाना समवेत ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या.
आमदार संतोष बांगर हे प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेनेच्या उमेदवार नदीमा फातेमा मिनाजूल हसन तांबोळी यांच्या प्रचारासाठी गेले होते. या प्रचारसभेत त्यांनी मतदारांना आवाहन करतांना ‘अल्लाह की दुवा, अल्लाह का आशिर्वाद एक सहस्र एक टक्के मौलाना के पिछे है, एक सहस्र एक टक्के हमारा मौलाना चुन के आना’, असे आवाहन केले. या वेळी उपस्थित मौलानाने बांगर यांच्या हातातील ध्वनीवर्धक (माईक) घेऊन ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या. त्याला बांगर यांनी वरीलप्रकारे प्रतिसाद दिला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.