‘मार्च २०२० पासून संपूर्ण भारतातील जनता कोरोना महामारीमुळे त्रस्त झाली होती. २२.३.२०२० पासून संपूर्ण भारतात दळणवळण बंदी लागू होती. १.६.२०२० या दिवशी भारत सरकारने दळणवळण बंदी थोडी शिथिल केली होती. ३.६.२०२० या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दैवी प्रवासाला आरंभ झाला आणि त्या रामनाथी (गोवा) येथून कर्नाटक राज्यात गेल्या. ५.७.२०२० या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनंतर सप्तर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना कर्नाटक राज्यातील काही मंदिरांत जाऊन देवदर्शन करायला सांगितले. त्यानंतर सप्तर्षींनी देहली आणि राजस्थान या राज्यांमध्ये जायला सांगितले. शुक्रवार, २४.७.२०२० या दिवशी सप्तर्षींनी अमरसर (राजस्थान) येथील श्री कालिकामाता मंदिरात जायला सांगितले. त्याप्रमाणे त्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री कालिकामाता मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.
१. अमरसर (राजस्थान) येथील श्री कालिकामाता मंदिराचा इतिहास
राजस्थान राज्यात जयपूर जिल्ह्यातील अमरसर गावाजवळ एक सुंदर पर्वत आहे. या पर्वतावर श्री कालिकादेवीचे मंदिर आहे. देवीच्या ५१ शक्तिपिठांपैकी हे एक शक्तिपीठ आहे. सत्ययुगात आदिशक्तीने या पर्वतावर शुंभ-निशुंभ या दैत्यांचे वध केले. याच पर्वतावर काकभुजंड ऋषींनी तपश्चर्या केली आहे. या पर्वताच्या २ – ३ कि.मी. परिसरात एकही कावळा येत नाही. पूर्वीच्या काळी हा सर्व परिसर विराट नगराचा एक भाग होता. ‘येथे येऊन पांडवांनी तपश्चर्या केली होती’, असे म्हटले जाते. (‘काकभुजंड ऋषींचे शरीर कावळ्यासारखे आहे. प्रलय झाल्यावर सृष्टीचा विनाश होतो. तेव्हा काकभुजंड ऋषि कावळ्याच्या रूपात असल्याने ‘प्रलय बघू शकणारे ते एकमेव ऋषि आहेत’, असे मानले जाते.’ – संकलक)
२. कालिकामाता मंदिरात दर्शन घेतल्यावर घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !
२ अ. मंदिराच्या महंतांनी मंदिर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थाने दाखवणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कालिकामाता मंदिरातील महंत श्री श्री १०८ प्रेमगिरी महाराज यांची भेट घेतली आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. या वेळी महंतांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना मंदिराच्या आतील आणि बाहेरील परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थाने दाखवली.
२ आ. देहली येथील युवा वाहिनीच्या पदाधिकार्यांशी भेट होणे आणि त्यांना ‘हा दैवी योगायोग आहे’, असे वाटणे : या महंतांची भेट घेऊन आम्ही बाहेर पडत असतांना देहली येथील हिंदु युवा वाहिनीचे पदाधिकारी महंतांना भेटायला आले. या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांना सनातन संस्थेचे कार्य सांगितले. तेव्हा ते धर्मप्रेमी ‘पुढे गोव्यातील आश्रमाला आम्ही भेट द्यायला येऊ’, असे म्हणाले. त्यांच्यातील एक प्रमुख व्यक्ती म्हणाली, ‘‘आज श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी आमची भेट होणे’, हा केवळ दैवी योगायोग आहे.’’
३. कृतज्ञता
‘सर्वत्र कोरोना महामारीचे संकट असतांना आणि त्यामुळे भारतातील अनेक प्रमुख मंदिरे बंद असतांनाही सप्तर्षींनी सांगितलेले हे मंदिर उघडे असणे आणि तेथे दर्शन घेता येणे’, हा सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याचाच एक भाग आहे’, असे जाणवले. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रार्थनेने सर्व साधकांना दैवी कवच लाभेल आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक असणारे चैतन्य अन् शक्ती मिळेल’, असे वाटले. यासाठी आम्ही सनातनचे सर्व साधक श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सप्तर्षि यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (२४.७.२०२०)