भारतीय सैन्याला ‘संरक्षणदल’ न म्हणता ‘सशस्त्र सैन्यदल’ म्हणावे ! – भूषण गोखले, निवृत्त एअर मार्शल

भूषण गोखले, निवृत्त एअर मार्शल

पुणे – भारतीय सैन्याला ‘संरक्षणदल’ न म्हणता ‘सशस्त्र सैन्यदल’ म्हणणे योग्य आहे. ‘संरक्षण’ हा शब्द बचावात्मक पवित्रा दर्शवतो, तर ‘सशस्त्र सैन्यदल’ आत्मविश्वास जागवतो. त्यामुळे भारतीय सैन्याला ‘संरक्षणदल’ न म्हणता ‘सशस्त्र सैन्यदल’ म्हणावे, असे आवाहन सेवानिवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी येथे केले.

पुणे येथील श्री बालाजी (अभिमत) विद्यापिठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत १६ जानेवारी या दिवशी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. ‘लढाऊ पायलटप्रमाणे युवकांनी उच्च ध्येय ठेवावे; मात्र ज्या समाजाने आपल्याला मोठे केले, त्या समाजासाठी कार्य करायचे असल्याने स्वतःचे पाय भूमीवर घट्ट ठेवावेत’, असा उपदेशही गोखले यांनी दिला.

विद्यार्थ्यांनो आत्मनिर्भर व्हा ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम केल्यास विलक्षण प्रगती करता येईल. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना प्रत्येकाने आत्मनिर्भर झाले पाहिजे, तसेच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.