नवी देहली – देशातील सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे १६ जानेवारीच्या मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने नवी देहली येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
लखनौ (लक्ष्मणपुरी) घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ या दिवशी लक्ष्मणपुरी येथे झाला होता. कथ्थक कुटुंबात जन्मलेल्या बिरजू महाराजांचे वडील अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हेसुद्धा प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. वडिलांचे अकाली निधन झाल्याने कुटुंबाचे दायित्व प. बिरजू महाराज यांच्या खांद्यावर आले होते. त्यांनी काकांकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास आरंभ केला. कथ्थक नर्तनासमवेतच ते उत्कृष्ट संगीतकार, शास्त्रीय गायक आणि वादक, तसेच अप्रतिम कवी आणि कुशल चित्रकारही होते. त्यांच्या अनेक रचना प्रसिद्ध आहेत. कथ्थक नृत्याच्या लखनौ कालका-बिंदादीन घराण्याचे ते अग्रगण्य नर्तक होते. भारतीय शास्त्रीय नृत्य, विशेष करून कथ्थक नृत्याला भारतात, तसेच विदेशात सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यामध्ये या प. बिरजू महाराज यांचे मोलाचे योगदान आहे.
प. बिरजू महाराज यांना वर्ष १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (पद्मविभूषण पुरस्कार हा भारतातील दुसर्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे.) यासह त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आणि कालीदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदु विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठ यांनीही प. बिरजू महाराज यांना मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे. चित्रपटांतील नृत्य दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय नृत्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नृत्य करतांनाही श्रीकृष्णाची आराधना करणारे म्हणजे नृत्यकला श्रीकृष्णाला अर्पण करणारे पं. बिरजू महाराज !
‘शास्त्रीय नृत्य हे ईश्वराच्या अनुसंधानात रहाण्याच्या (साधनेच्या) मार्गांपैकी एक आहे’, असे त्यांना वाटायचे. श्रीकृष्ण हे त्यांचे आराध्य देवत होते. नृत्य करतांना त्यांचे श्रीकृष्णाशी सतत अनुसंधान असायचे. नृत्य करतांना ते श्रीकृष्णाला कसे अनुभवत, हे त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहे.
‘मी नृत्य करतांना श्रीकृष्ण माझ्या समवेत असतो. मी ‘थै’ आणि ‘ता’ यांचा ताल सांभाळतांना देव माझा तोल सांभाळून घेत असतो. मी श्रीकृष्णालाच माझी कला अर्पण केली आहे. रंगमंचावर नृत्य करतांना मी नृत्य करत नसतो, तर मी श्रीकृष्णाच्या मागे धावत पाठलाग करत असतो.’ – पं. बिरजू महाराज (२७.११.२०१०))
पं. बिरजू महाराज यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !‘भारतीय नृत्य कलेला जगभरात एक अनोखी ओळख मिळवून देणारे, आयुष्यभर केलेची साधना करणारे कथ्थक नृत्यकलेचे तपस्वी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !’ – सौ. सावित्री इचलकरंजीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. |
(पं. बिरजू महाराज यांच्या गुणवैशिष्ट्यांविषयीचे सविस्तर लिखाण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)