मुक्त पत्रकार राजीव शर्मा याने चिनी गुप्तहेरांना भारताची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड !

  • अंमलबजावणी संचालनालयाकडून ४८ लाख रुपयांची संपत्ती कह्यात !

  • चीनच्या साम्यवादी पक्षाचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये करत होता स्तंभलेखन

  • पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट

देशाच्या सुरक्षेशी खेळणार्‍या अशा पत्रकारांना सरकारने ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – पैशांसाठी चिनी गुप्तहेरांना भारताची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवणारा मुक्त पत्रकार राजीव शर्मा याची ४८ लाख रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कह्यात घेतली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. शर्मा याचे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारे आहे, असे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे.

१. झँग चेंग उपाख्य सूरज, झँग लिक्सिया उपाख्य उषा, क्वींग शी हे चिनी नागरिक, तसेच शेर सिंह उपाख्य राज बोहरा हा नेपाळी नागरिक, असे चौघे जण देहलीतील महिपालपूर येथे ‘शेल’ हे आस्थापन चालवत होते. चिनी गुप्तहेरांकडून या आस्थापनाला, तर या आस्थापनाकडून शर्मा याला पैसे पुरवण्यात येत होते. शर्मा याला कधी रोख, तर कधी मित्राच्या माध्यमातून पैसे पुरवण्यात येत होते. (ही माहिती गुप्तचर यंत्रणांना कशी मिळाली नाही  ? या आस्थापनाला अनुमती देणारे अधिकारी आणि पोलीस यांचीही चौकशी सरकारने केली पाहिजे ! – संपादक)

२. शर्मा हा मुक्त पत्रकारिता करत होता. मागील २ दशके त्याने ‘दी क्वींट’, ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया’, ‘दी ट्रीब्यून’, ‘फ्री प्रेस जर्नल’, ‘सकाळ’ यांसारख्या नामवंत वृत्तपत्रांमध्ये ‘संरक्षण अन् परराष्ट्र व्यवहार’ या विषयांवर वृत्तांकन केले आहे. त्याने चीनच्या साम्यवादी पक्षाचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मध्येही अनेकदा स्तंभलेखन केले आहे.