बेंगळुरू (कर्नाटक) – प्रेमभाव, इतरांचा विचार करणे आदी गुण असलेले आणि श्रीगुरूंप्रती अढळ श्रद्धा असलेले बेंगळुरू येथील साधकदांपत्य श्री. सदानंद कळ्से (वय ७० वर्षे) आणि सौ. सुधा कळ्से (वय ६२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता १२ जानेवारी २०२२ या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक संत पू. रमानंद गौडा यांनी दिली. या प्रसंगी पू. रमानंद गौडा यांनी श्री. सदानंद कळ्से आणि सौ. सुधा कळ्से यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. श्री. सदानंद कळ्से यांचे उपाहारगृह आहे. गेल्या २१ वर्षांपासून त्यांच्या रहात्या घरातील तळघर त्यांनी सनातन संस्थेच्या कार्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.
‘साधकत्व, आंतरिक गुण आणि अल्प अहं असल्यामुळेच श्री. सदानंद आणि सौ. सुधा कळ्से हे दांपत्य जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहे’, असे पू. रमानंद गौडा या वेळी म्हणाले.
ही वार्ता ऐकून श्री. सदानंद कळ्से यांचा भाव पुष्कळ जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘मी छोटीशी जागाच दिली आहे. ‘अशा जागेतही गुरूंचे एवढे महान कार्य चालत आहे’, हे पाहून मला पुष्कळ आनंद होत आहे. आमच्यावर अखंड गुरुकृपा आहे. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमचे सदैव रक्षण करत आहेत.’’