अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी वारंवार का करावी लागते ? – संपादक
सातारा, १५ जानेवारी (वार्ता.) – महाबळेश्वर जवळ असणार्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान थडग्याभोवती असणारे अतिक्रमण वन विभागाने तातडीने हटवावे.
३० दिवसांमध्ये हे अतिक्रमण न हटवल्यास महाबळेश्वर तालुक्यातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वन विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी निवेदनाद्वारे वन विभागाला देण्यात आली आहे.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाबळेश्वरचे प्रमोद कात्रट, हिंदु एकता दलाचे सनी मोरे, हिंदु आघाडीचे ओंकार पवार, अजय सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचे थडगे बांधले. हे थडगे ५ बाय ५ चौरस फूट होते. पाकिस्तान येथे रहात असलेल्या अफझलखानाच्या वंशजांनी काही लोकांना हाताशी धरून ‘हजर महंमद अफझल मेमोरियल सोसायटी’ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी मिळून वन खात्याच्या भूमीवर अतिक्रमण करत ५ सहस्र चौरस फूट अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण काढण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने सूचना दिल्या आहेत; मात्र तरीही न्यायालयाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. (न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्या वन विभागावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक) येत्या ३० दिवसांत न्यायालयाच्या आदेशावर वन विभागाने कोणतीही कारवाई केली नाही, तर महाबळेश्वर तालुक्यातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.