जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या आरंभी कोरोना गाठेल सर्वोच्च स्तर !
कानपूर (उत्तरप्रदेश) – संपूर्ण देशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून हीच कोरोनाची तिसरी लाट असल्याचे म्हटले जात आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर भर दिला जात असून ‘बूस्टर डोस’ (वर्धक मात्रा) देण्यासही आरंभ करण्यात आला आहे. यातच आता आयआयटी कानपूरच्या एका ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त प्राध्यापकाने देशातील कोरोनाची तिसरी लाट मार्च मासापर्यंत संपलेली असेल, असा दावा केला आहे.
आयआयटी कानपूरचे प्रा. मणिंद्र अग्रवाल यांनी आपल्या गणितीय सूत्रांचा वापर करून कोरोनाच्या तिसर्या लाटेसंदर्भात म्हटले आहे की, जानेवारी मासाच्या शेवटी आणि फेब्रुवारी मासाच्या आरंभी कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सर्वोच्च स्तर असेल. त्यानंतर मात्र कोरोनाची तिसरी लाट न्यून होण्यास आरंभ होईल आणि मार्च मासापर्यंत ती संपलेली असेल.
कोरोनाच्या दुसर्या लाटेपेक्षा अधिक रुग्णसंख्या !
कोरोनाच्या दुसर्या लाटेपेक्षा अधिक रुग्णसंख्या तिसर्या लाटेच्या वेळी पहायला मिळू शकते. देहलीत प्रतिदिन आढळणार्या रुग्णांचा आकडा आताच्या घडीला सरासरी २२ सहस्र असून तो येत्या काही दिवसांत ४० सहस्रांपर्यंत पोहोचू शकतो, असा दावाही प्रा. अग्रवाल यांनी केला आहे. केवळ राजकीय प्रचारसभा कोरोना वाढीचे कारण नसून अन्य अनेक कारणे कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत असल्याचेही अग्रवाल म्हणाले.
देशभरात कोरोनाचा संसर्ग गतीने वाढल्याने आता देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही ८ लाख २१ सहस्र ४४६ पर्यंत वाढली आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या राष्ट्रीय पातळीवर ४ सहस्र ४६१ एवढी झाली आहे.