आयुष्यातील अत्यंत प्रतिकूल काळात भगवंताने पावलोपावली साहाय्य करून दिलेला आधार !

११.१.२०२२ या दिवशीच्या ‘दैनिक सनातन प्रभात’च्या अंकात या लेखाचा काही भाग पाहिला. आजच्या अंकात लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/542968.html

३. नातेवाईक अथवा परिचित व्यक्तींनी घरी येऊन आश्रमात न जाण्याविषयी सांगणे, अशा वेळी देवाने शांत रहाण्यास सांगणे अन् कालांतराने नातेवाइकांचे घरी येणे न्यून होणे  

घरी कुणी नातेवाईक अथवा परिचित आले की, ते घरात घडलेल्या एखाद्या प्रसंगाचा विषय मुद्दाम काढत. त्यामुळे कुटुंबीय  भावनाप्रधान होऊन दुःखी होत. परिणामी नातेवाईक आणि परिचित यांना ‘मी आश्रमात न जाता घरीच रहायला हवे’, असे वाटायचे आणि त्यासाठी ते आग्रही व्हायचे. असे घडल्यावर देव मला आतून काहीही न बोलता शांत रहाण्यास सांगत असे. मी देवाला विचारायचे, ‘आता मी बोलले नाही, तर ‘मला इथेच रहाणे मान्य आहे’, असे त्यांना वाटेल आणि तसे झाले, तर मला आणखीच कठीण होईल !’ त्यावर देव सांगायचा, ‘आता तू केवळ शांत रहा. ‘शांत रहाणे’, हीच तुझी आताची साधना आहे.’ त्यानंतर मी अशा प्रसंगांकडे दुर्लक्ष करू लागले. हळूहळू घरी येणारे नातेवाईक, तसेच परिचित व्यक्ती यांचे येणे आपोआपच न्यून झाले. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातीलच अडचणी पुष्कळ वाढल्या. त्यामुळे ते कधी घरी आलेच, तर ‘त्यांना त्यांच्या समस्यांवर बोलणे’, हाच मोठा विषय होऊन माझ्याशी बोलायची आठवणही होत नसे. या प्रसंगातून देवाने मला जणू ‘श्रद्धा आणि सबूरी’ यांचा पाठच दिला.

४. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेविषयीचा अपसमज दूर होण्यासाठी तिच्या कुटुंबियांशी बोलणे

एकदा कुटुंबियांसह माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली होती. त्या वेळी कुटुंबियांच्या मनात माझ्याविषयी असलेला अपसमज दूर होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःहून त्यांना विविध सूत्रे सांगितली. ‘माझ्या अडचणी आणि त्रास दूर व्हावेत, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत’, हे पाहून मला पुष्कळ भरून आले. आईसुद्धा इतक्या मायेने करणार नाही, इतकी परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी काळजी घेतली आहे.

माझी आणि परात्पर गुरु डॉक्टरांची स्थुलातून भेट क्वचितच झाली; पण ‘माझ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) नियंत्रण आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवत होते. साधकांसाठी अखंड कार्यरत असणार्‍या परात्पर गुरु डॉक्टररूपी गुरुतत्त्वाप्रती मी जन्मभर अखंड कृतज्ञता व्यक्त करत राहिले, तरी ती अपुरीच असणार आहे.’  – एक साधिका (मे २०२०)

(समाप्त)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक