संपादकीय
हिंदु नव्हे, तर जिहादी हे शिखांचे शत्रू आहेत, हे खलिस्तानवाद्यांना समजायला हवे !
‘सिख फॉर जस्टिस’ या विदेशस्थित खलिस्तानी आतंकवादी संघटनेने २६ जानेवारी या भारताच्या प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये भारताचे नव्हे, तर त्या संघटनेचे झेंडे फडकावण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी थोडेथोडके नव्हे, तर १ मिलियन डॉलर (साधारण ७५ कोटी रुपये) इतका व्यय करण्याचे नियोजन केले आहे. ‘तिरंगा फडकावणे बंद करा’ अशा अर्थाचे चित्र प्रसारित करून आणि नागरिकांना घरात रहाण्याचे आवाहन करून गुरपतवंतसिंह पन्नू या संघटनेच्या प्रमुखाने हा संदेश दिला आहे. पंजाब दौर्यावर गेलेले पंतप्रधान मोदी यांना फिरोजपूर येथे अडवण्याच्या धक्कादायक घटनेचे दायित्व ‘सिख फॉर जस्टिस’ याच संघटनेने घेतल्यानंतर तिने आता वरील प्रकारे भारतद्वेषी चेतावणी दिली आहे. २३ डिसेंबरला पंजाबमधील लुधियाना येथे मोठा बाँबस्फोट झाला होता. त्या स्फोटासाठी याच खलिस्तानी आतंकवादी संघटनेच्या कार्यकर्त्याला ‘मुख्य सूत्रधार’ म्हणून जर्मनीच्या सहयोगाने अटक करण्यात आली. देशाच्या राजधानीत खलिस्तानी झेंडे फडकावण्याचे उघड आवाहन करण्यापर्यंत आणि पंतप्रधानांना मारण्याचा कट रचण्यापर्यंत या संघटनेची मजल गेली आहे. खलिस्तान्यांकडून वारंवार वर्ष १९८४ च्या शीख हत्याकांडाचा उल्लेख करण्यात येतो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या शीख सुरक्षारक्षकाने केल्यानंतर देशभरात साडेतीन सहस्र शिखांचे हत्याकांड झाले. त्याची चौकशी झाली नाही आणि आरोपींना शिक्षा झाली नाही. याला न्यायव्यवस्था आणि तत्कालीन शासनकर्ते उत्तरदायी आहेत; पण म्हणून राष्ट्रद्रोह करणे, हे सयुक्तिक कसे ? इंदिरा गांधी यांनी अमृतसर येथील सुवर्णमंदिरात ‘ऑपरेश ब्ल्यू स्टार’ करून ‘खलिस्तानवाद्यांना पुरते नेस्तनाबूत केले’, असे वाटत होते; मात्र आज विदेशात फोफावलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ या वेगळ्या खलिस्तानची मागणी करणार्या आतंकवादी संघटनेच्या कारवाया पहाता प्रत्यक्षात मुळे नष्ट न होता विदेशात ती वाढत राहिली. विदेशात जाऊन शत्रूला ठार करणार्या इस्रायलसारखे धोरण भारताने ठेवले असते, तर कदाचित् आज ही वेळ आली नसती. भारताचे विभाजन करून शिखांसाठी वेगळा खलिस्तान प्रांत मागून पंजाबला भारतापासून तोडू पहाणार्या या भारतद्वेषी संघटनेची जडण-घडण विदेशात पुन्हा झाली. गेल्या २० वर्षांपासून कॅनडा आणि अमेरिका या देशांतून या संघटनेला पैसा पुरवला जातो अन् या देशांत ही संघटना फोफावत आहे. देहली सीमेवरील शेतकर्यांचे आंदोलन उग्र रूप धारण करू लागल्यावर त्यांना असलेला विदेशस्थित खलिस्तानी संघटनेचा पाठिंबा जनतेसमोर प्रथम उघड झाला. गेल्या २० वर्षांत या संघटनेच्या कारवाया विदेशात जिथल्या तिथे दडपल्या गेल्या असत्या, तर आज थेट देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची मजल जाईपर्यंत त्या मोठ्या झाल्या नसत्या.
क्रूर इस्लामी अत्याचारांच्या इतिहासाविषयी अज्ञान !
‘या संघटनेच्या शीख पंथियांना वेगळा खलिस्तान का हवा आहे ?’, ‘त्यांना एवढा भारतद्वेष का आहे ?’ या सर्व प्रश्नांच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येते की अन्य भारतियांप्रमाणेच शिखांमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव ! काँग्रेस सरकारने देशबांधवांना धर्मशिक्षण न दिल्याने त्यांना त्यांचा इतिहास ठाऊक नाही. त्यामुळेच त्यांच्यात धर्म आणि राष्ट्र यांविषयी धर्माभिमान निर्माण झाला नाही. शिखांमध्येही त्यामुळेच मूळ हिंदु धर्मापासून आणि त्यांच्या मूळ हिंदु राष्ट्रापासून वेगळे होण्याची विचारधारा निर्माण झाली आहे. मुळात शीख पंथांची निर्मितीच हिंदु धर्मातूनच झाली आहे. ‘जिवंत रहायचे असेल, तर इस्लामचा स्वीकार करा’, अशी धमकी क्रूरकर्मा औरंगजेबाने शिखांचे नववे धर्मगुरु गुरु तेगबहाद्दुर यांना दिली. त्यांचा अनन्वित छळ करून अंतिमतः त्यांचे शिर उडवण्यात आले; परंतु त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही. त्यांचे पुत्र गुरु गोविंदसिंह यांनी धर्मरक्षणासाठी लढण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी वर्ष १६९५ मध्ये औरंगजेबाच्या धमकी देणार्या पत्राला प्रतिआव्हान देणारे पत्र धाडले. गुरु गोविंदसिंह यांनी औरंगजेबाचे वर्चस्व झुगारून त्याला पाठवलेला अत्यंत ओजस्वी वाणीतील क्षात्रवृत्तीने ओतप्रोत भरलेला ‘मृत्यूचा खलिता’ जर प्रत्येक शीख मुलाला शिकवला गेला असता, तर आज खचितच शिखांनी धर्मांध आतंकवादी संघटनांशी हातमिळवणी केली नसती ! इस्लाम स्वीकारण्यासाठी सहस्रो शिखांना हालहाल करून मोगलांनी मारल्याचा इतिहास आहे. मोगलांच्या जुलमी अत्याचारांना तोंड देण्यासाठी त्यांनी लढवय्यांचा खालसा पंथ स्थापन केला. मोगलांशी लढण्यासाठी प्रत्येक घरातील पहिला पुत्र देऊन संघटित होण्याची, देश आणि धर्म यांच्यासाठी बलीदान देण्याची एक श्रेष्ठ परंपरा त्यांनी निर्माण केली. गुरु गोविंदसिंह यांनी हिंदु समाजाचा निःपात करणार्यांचा विनाश करण्यासाठी शस्त्र हाती घेतले आणि स्वतःचे बलीदान दिले. त्यांच्या दोन्ही मुलांना मोगलांनी इस्लाम मान्य करत नाहीत म्हणून भिंतीत चिणून मारले. ‘हिंदु आणि शीख वेगळे नाहीत. हिंदु जिवंत राहिले, तरच शीख जिवंत रहातील’, असे त्यांनी वारंवार सांगितले. काही गुरुद्वारांमध्येही छायाचित्रांच्या रूपात हा इतिहास कोरलेला आहे. मोगलांच्या विरोधात लढतांना शीख बांधवांनी केलेले अनन्यसाधारण बलीदान समस्त शीख बांधवांना स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिकवले गेले असते, तर खलिस्तानी आतंकवाद्यांना आज पंजाबमधूनच मोठा विरोध झाला असता. गुरु गोविंदसिंह यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून मुद्दामहून त्याचे पंजाबी भाषेत भाषांतर करवून घेतले, तसेच शीख बांधवांना संस्कृत शिकण्यासाठी काशीला पाठवले. शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांची ६१ पदे आहेत. शिखांना त्यांच्या इतिहासाचे आणि त्यांचे मूळ स्वरूप ज्ञात होण्यासाठी वैचारिक जागृती मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. ‘शीख आणि हिंदु एकच आहेत आणि धर्मांधांसाठी दोघेही काफीर आहेत’, हे शिखांनी लक्षात घ्यायला हवे. ‘हिंदू नव्हे, तर धर्मांध हे शिखांचे शत्रू आहेत आणि हिंदू आणि शीख संघटित राहिले, तर त्यांना तोंड देऊ शकतात’, याचा प्रसार शिखांमध्ये झाला, तर आतंकवादी खलिस्तान्यांना नेस्तनाबूत करणे शीख आणि हिंदू यांना सोपे जाईल !