निवडणूक आयोगाच्या अनुमतीविना आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करून सभा घेण्याचा प्रयत्न
सरकारी नियमांचे आणि देशातील कायद्यांचे पालन न करण्यात अल्पसंख्यांक नेहमीच आघाडीवर असतात ! – संपादक
मडगाव – रुमडामळ, दवर्ली येथे ९ जानेवारी या दिवशी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांच्या सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते; मात्र या सभेला निवडणूक आयोगाची मान्यता नसल्याने आणि सभेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी व्यासपिठावर जाऊन ध्वनीक्षेपक यंत्रणा काढून घेऊन ही सभा बंद पाडली. (सरकारी नियमांचे पालन न करणार्या अल्पसंख्यांक विभागाविषयी काँग्रेसला काय म्हणायचे आहे ? – संपादक)
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे सार्वजनिक सभेच्या आयोजनासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता घेणे क्रमप्राप्त ठरते; मात्र काँग्रेसने रुमडामळ, दवर्ली येथील सभेसाठी अशी मान्यता घेतली नव्हती. या सभेला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दक्षिण गोवा प्रशासनाने अनुज्ञप्ती दिली होती; मात्र ८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने पूर्वी दिलेली अनुज्ञप्ती आता रहित ठरत आहे. आयोजकांनी राज्य निवडणूक आयोगाकडून अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक होते. आयोजकांना अनुमतीविना सभा घेता येणार नाही, असे पोलिसांनी कळवले होते; मात्र तरीही सभा घेण्यात आली. (यावरून अल्पसंख्यांक आणि त्यातही धर्मांध पोलिसांच्या सूचनेलाही न जुमानण्याएवढे उद्दाम झाले आहेत, हेच दिसून येते ! – संपादक)
सभा चालू केल्याने पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर संतप्त झाले आणि म्हणाले, ‘‘सभेवर कारवाई न केल्यास निवडणूक आयोग आम्हाला घरी पाठवणार.’’ सभेत मुख्य वक्ते इम्रान प्रतापगडी बोलण्यापूर्वीच सभा बंद पाडण्यात आली. यानंतर ध्वनीक्षेपकाविना इम्रान प्रतापगडी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘देशभरात सध्या अल्पसंख्यांकांच्या विरोधात घडामोडी घडत असल्याने भाजप शासन हटवणे अत्यावश्यक आहे’, असे ते म्हणाले. (स्वतः कायदा मोडायचा आणि कारवाई केली की, शासनावर टीका करायची, हे धर्मांधांचे नेहमीचेच आहे ! – संपादक)