जैश-ए-महंमद या संघटनेतील आतंकवाद्याच्या हस्तकाला कोणतेही स्थानिक साहाय्य मिळाले नाही ! – पोलीस आयुक्त

अधिक चौकशीसाठी नागपूर पोलीस आतंकवाद्यांचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख याला कह्यात घेणार !

पोलीस आयुक्त अमितेशकुमार

नागपूर, १० जानेवारी (वार्ता.) – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय पुन्हा एकदा आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदच्या अग्रस्थानी (‘हिटलिस्ट’वर) असल्याचे स्पष्ट होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या आतंकवादी संघटनेचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख याने नागपूर येथे येऊन रेकी केल्याची गोष्ट उघड झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी अन्वेषणाला प्रारंभ केला आहे. याविषयी १० जानेवारी या दिवशी पोलीस आयुक्त अमितेशकुमार पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, जैश-ए-महंमद संघटनेचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख ज्या वेळी संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी येथे आला होता, तेव्हा त्याला येथे कोणतेही स्थानिक साहाय्य मिळाले नाही. त्यामुळे तो त्याच्या कामात अपयशी ठरला होता.

ते पुढे म्हणाले की, जैशचा हस्तक शेख याला ‘तुम नागपूर जाओ, तुम्हारी साहाय्य के लिये एक आदमी आयेगा’, असा संदेश देण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात तो नागपूर येथे आल्यानंतर कुणीही त्याच्या साहाय्याला पुढे आले नाही. त्यामुळे त्याला त्याचे ध्येय पूर्ण करता आले नाही, असे अन्वेषणातून पुढे आले आहे. रईस शेख हा नागपूर येथे कुणाच्या साहाय्याने आला ? त्याने नागपूर येथे आणखी कुठे कुठे रेकी केली होती का ? त्याने कोणती माहिती गोळा केली आणि ती कुणाला पुरवली ? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नागपूर पोलीस आतंकवादी रईस याची पोलीस कोठडी घेणार आहेत.