असे मुख्य निवडणूक अधिकार्यांना म्हणावे लागणे आणि निवडणुकांत पैशांचे वाटप होणे आतापर्यंतच्या सर्व राजकीय पक्षांना लज्जास्पद !
पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी पैसे वाटप झाल्यास ते रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे विधान गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी केले आहे. गोव्यातील निवडणुकीविषयीच्या सिद्धतेविषयी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
#GoaDiary_Goa_News We are ready to prevent distribution of cash: CEO https://t.co/bxYStw7eER
— Goa News (@omgoa_dot_com) January 7, 2022
सध्या कोरोना महामारीच्या काळात गोव्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे आपण यासाठी कोणती सिद्धता केली आहे ? या प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणाले, ‘‘भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आम्ही आराखडा सिद्ध केला आहे. मतदारांची मतदार केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठी आणखी ६० मतदार केंद्रे वाढवली आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर १ सहस्र २०० मतदार ठेवता येतात; परंतु गोव्यात ८० टक्के मतदान होत असल्याने मतदार केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठी आम्ही ही संख्या १ सहस्र मतदारांपर्यंत मर्यादित ठेवली आहे.’’
राजकीय सभा आणि मेळावे यांमध्ये उपस्थिती असण्याच्या मर्यादेविषयी ते म्हणाले, ‘‘उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारासमवेत किती माणसे असावीत ? तसेच किती वाहने असावीत यावर निवडणूक आयोगाने मर्यादा घातल्या आहेत, तसेच राजकीय पक्षांना याविषयी माहिती देण्यात आली आहे. राजकीय सभांसाठी उपलब्ध असलेली मैदाने हेरून त्यावर किती व्यक्तींना अनुमती द्यावी, हे राज्य आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या सूचनांनुसार ठरवण्यात येईल. राजकीय पक्षांनी प्रचार करतांना सामाजिक अंतर ठेवणे, तसेच इतर कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती राजकीय पक्षाचा मेळावा किंवा फेरी यांत सहभाग घेत असेल, तर तिच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेविषयी ती व्यक्ती उत्तरदायी असेल.’’
शांततामय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, यासाठी मुख्य निवडणूक कार्यालयाने काय पावले उचलली आहेत ? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,
‘‘आम्ही क्षेत्र अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना संवेदनशील क्षेत्रांची पहाणी करण्यास सांगितले असून कुठे मतदारांना धमकावले जाणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. आम्ही पोलिसांना मागच्या निवडणुकीच्या वेळी ज्यांच्या नावावर गुन्हे नोंद झाले आहेत, अशा गुन्हेगारांची सूची सिद्ध करण्यास सांगून त्यांच्यावर नजर ठेवण्यास सांगितले आहे’’ निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना पैसे वाटले जातात, हे थांबवण्यासाठी आपण काय नियोजन केले आहे ? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘पैसे वाटपावर नजर ठेवण्यासाठी आम्ही भरारी पथके, निरीक्षण पथके नियुक्त करणार आहोत.
हे रोखण्यासाठी ईडी, एनसीबी, सीआयएसएफ, डीआरआय आदी एजन्सीसमवेत कार्यशाळा घेतली असून एकंदर निवडणुकीची प्रक्रिया, त्यासंबंधी होणारा खर्च यांवर नजर ठेवली जाईल.’’