जोगश्वरी (मुंबई) येथील शिकवणीवर्गांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा विद्यार्थांनी केला निर्धार !

मुंबई – जोगश्वरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन शिकवणीवर्गांत झालेल्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा निर्धार केला आणि ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणे टाळले.

जोगेश्वरी पूर्वेच्या सर्वोदयनगर येथील ‘निकम क्लासेस’ या शिकवणीवर्गात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील ठाकूर यांनी व्याख्यान घेतले, तर ‘विजय क्लासेस’ येथे समितीच्या सौ. नीता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी ३१ डिसेंबर या दिवशी नवीन वर्षाचे स्वागत केल्याने होणारे तोटे विस्तृतपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. ‘१ जानेवारी हे आपल्या संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष कसे नाही’, याविषयीही सांगण्यात आले. त्याचप्रमाणे हिंदूंचे नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून कसे आहे, याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली.

‘‘३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम केले जातात. त्या वेळी धुम्रपान, मद्यपान करून ध्वनीवर्धकाच्या तालावर हिडीस अंगविक्षेप करत नृत्य करणे, धिंगाणा घालणे, मद्यपान करून भरधाव वेगाने वाहने हाकणे,  अश्लील शब्दांत बोलणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, महिलांची छेड काढणे यांसारखे अनेक अपप्रकारही होतात. यामुळे नव्या वर्षाचा प्रारंभ शुभ होण्याऐवजी ‘अशुभ’ पद्धतीने होतो. याउलट हिंदु धर्माच्या संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि लाभदायक आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजेच सत्ययुगाला आरंभ झाला, तो गुढीपाडवा हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण केल्याने भारतीय संस्कृतीचे होणारे अध:पतन आपणच रोखणे, हे आपल्या सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे’’, असे मार्गदर्शन दोन्ही शिकवणीवर्गांतील विद्यार्थ्यांना करण्यात आले.

चर्चात्मक स्वरूपात झालेल्या या दोन्ही ठिकाणच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन ‘नवीन वर्ष ‘गुढीपाडव्याला’च साजरा करण्या’चा निर्धार केला.