‘पद्मश्री’ सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन !

सिंधुताई सपकाळ

पुणे – अनाथांसाठी सेवाकार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यातील ‘गॅलेक्झी हॉस्पिटल’मध्ये ४ जानेवारीला रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्यांना वर्ष २०१२ मध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ मिळाला होता, तर वर्ष २०२१ या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना देशात आणि विदेशातही शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. समाजात त्यांनी निराधार मुलांसाठी केलेल्या विशेष कार्याचे कौतुक होत असून त्यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

सिंधुताई सपकाळ यांचा अल्प परिचय

अनाथ मुलांसमवेत सिंधुताई सपकाळ

स्वत:च्या तरुण वयात त्यांना अनाथ मुलांचा भीषण प्रश्न लक्षात आल्यावर त्यांनी याच कार्यासाठी आयुष्य वेचण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी पुण्यात आदिवासींच्या भूमी वाचवण्यासाठी लढा दिला. काही अनाथ मुलांचे संगोपन करण्यास प्रारंभ केला आणि नंतर पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्धा येथे अभिमान बाल भवन, पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन आणि शिक्षण संस्था इत्यादी संस्था, वसतिगृहे यांची स्थापना केली. या वसतिगृहात राहून शेकडो अनाथ मुले शिक्षण घेत आहेत, तसेच काही निराधार वृद्धही तेथे वास्तव्याला आहे. त्यांच्या वसतिगृहातील अनेक मुले आधुनिक वैद्य, अभियंते, अधिवक्ते बनली आहेत.

सौजन्य : TV9 मराठी