वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी अल्प पडू देणार नाही ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा, ४ जानेवारी (वार्ता.) – वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने सिद्ध करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहील ? यासाठी मी स्वत: लक्ष घालेन. स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी अल्प पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते. या वेळी लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांतील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले,

१. वैद्यकीय महाविद्यालयाची प्रयोगशाळा क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटी ९९ लाख रुपये व्यय करण्यात येणार आहेत.

२. १३ कोटी ५० लाख रुपये व्यय करून विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १ कक्ष, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी २ कक्ष आणि ५ साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. बहुउद्देशीय सभागृह, भोजन कक्ष, स्वयंपाक कक्ष, स्वागत कक्ष, प्रतिक्षालय तसेच ‘स्टोअर रूम’चीही सुविधा असणार आहे.

३. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून कोणकोणत्या सुविधा ‘सैनिक स्कूल’साठी असाव्यात, याचा आराखडा सिद्ध करावा. प्रतिवर्षी १०० कोटी याप्रमाणे ३०० कोटी रुपये ‘सैनिक स्कूल’साठी देण्यात येणार आहेत.