महावितरण कर्जबाजारी : दळणवळण बंदीमधील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ !

८ सहस्र ५०० कोटी रुपयांचे कर्ज आणि त्यावर २ सहस्र ९०० कोटी रुपयांचे व्याज

मुंबई, ३ जानेवारी (वार्ता.) – महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून या डबघाईचे खापर मात्र सरकारकडून दळणवळण बंदीवर फोडण्यात आले आहे. दळणवळण बंदीच्या काळात विजेचा वापर न्यून होऊनही देयकांची वसुली न झाल्यामुळे आर्थिक फटका बसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी महावितरण ८ सहस्र ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेत असून या कर्जावर महावितरणला २ सहस्र ९०० कोटी रुपये इतके व्याज द्यावे लागणार आहे, म्हणजे महावितरणला व्याजासह ११ सहस्र ४०० कोटी रुपये परतफेड करावी लागणार आहे.

राज्याची नियमितची विजेची सरासरी मागणी २३ सहस्र मेगावॅट इतकी आहे. दळणवळण बंदीच्या कालावधीत नियमितच्या विजेची मागणी १६ सहस्र मेगावॅटपर्यंत घटली होती. महावितरणने घेतलेल्या या कर्जाची हमी सरकारने घेतली आहे. धनको या संस्थेकडून महावितरण हे कर्ज घेत असून कर्जाची वसुली वेळेत न झाल्यास महावितरणच्या चल किंवा अचल मालमत्तेची विक्री करून धनकोला (कर्ज देणारी संस्था) कर्जाची रक्कम वसूल करता येणार आहे.