सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्‍हाण हिंगोलीचे पाणी पळवत आहेत ! – सर्वपक्षीय नेत्‍यांचा आरोप

सर्वपक्षीय नेत्‍यांचा शेकडो ट्रॅक्‍टरसह कळमनुरी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा !

कळमनुरी येथील ट्रॅक्टर आंदोलन

हिंगोली – येथील कयाधू नदीचे पाणी यवतमाळ येथील इसापूर धरणात वळवण्‍यात येणार आहे. यामुळे नदी कोरडी पडून वाळवंट होण्‍याची शक्‍यता आहे. दुसरीकडे येथील बंधारे प्रस्‍ताव धूळ खात पडला आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यात सिंचनाचा मोठा अनुशेष असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्‍हाण हिंगोली येथील पाणी पळवत आहेत, असा आरोप स्‍थानिकांनी केला आहे. त्‍यांनी पाणी वळवण्‍याचा प्रस्‍ताव रहित करावा, या मागणीसाठी कळमनुरी येथील तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी यांनी २ जानेवारी या दिवशी ‘ट्रॅक्‍टर मोर्चा’ काढला. या मोर्च्‍यात शेकडो ट्रॅक्‍टरसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्‍थित होते. मागण्‍या मान्‍य न झाल्‍यास, तर येत्‍या २६ जानेवारी दिवशी पालकमंत्र्यांना जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर पडू देणार नाही, अशी चेतावणी माजी खासदार शिवाजी माने यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्‍ह्याचे पाणी वळवण्‍याच्‍या या प्रस्‍तावाविरुद्ध सर्व पक्षातील नेत्‍यांची एकजूट झाली आहे. खरबी बंधार्‍यातून पाणी वळवण्‍याचा प्रस्‍ताव रहित करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्‍यांची समिती गठीत झाली आहे. नांदेड जिल्‍ह्याला जायकवाडी, माजलगाव, एलदरी, सिद्धेश्‍वर, इसापूर आणि विष्‍णुपुरी यांसह इत्‍यादी प्रकल्‍पातून भरमसाठ पाणी मिळते. तरीही जिल्‍ह्याची जीवनवाहिनी असलेल्‍या कयाधू नदीचे पाणी वळवण्‍याचा बेत अशोकराव चव्‍हाण यांनी आखला आहे, असा आरोप हिंगोलीकरांनी केला आहे.