रविवारपासून नवीन लेखमाला !
‘सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या काही ज्ञानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर काळी (त्रासदायक) शक्ती होती की, त्यातील काही धारिका मला १० ते १५ वर्षे वाचणे शक्य होत नव्हते. अशा साधारण २५ धारिका होत्या. कालमाहात्म्यानुसार या धारिकांमधील काळी शक्ती उणावल्यावर आता हे ज्ञान वाचणे शक्य झाले आहे. नेहमी ज्ञान वाचतांना मी त्यातील सत्यताही पडताळतो; परंतु यातील काही धारिका वाचतांना लक्षात आले की, हे ज्ञान अतिशय कठीण आहे. ‘हे ज्ञान ईश्वरी राज्यात पुढील काही वर्षांनी कळू शकेल’, असे आहे. त्यामुळे मी काही धारिकांतील ज्ञानातील बारकावे अभ्यासले नाहीत. केवळ त्यांतील व्याकरण पडताळले, तसेच काही कठीण ज्ञानातून अधिक नाविन्यपूर्ण ज्ञान मिळाल्यामुळे मला अधिक आनंद मिळाला.
असे अद्वितीय ज्ञान वाचकांनाही कळावे, यासाठी हे सदर चालू करत आहोत. दैनिकातील जागेच्या मर्यादेमुळे येथे पूर्ण ज्ञान देणे शक्य नाही. यासाठी येथे केवळ प्रत्येक विषयाची अनुक्रमणिका देणार आहोत आणि त्याचे सविस्तर ज्ञान ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)
ही लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रत्येक रविवार आणि गुरुवार या दिवशी प्रकाशित करण्यात येईल, तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या प्रत्येक अंकात प्रकाशित करण्यात येईल. (३.११.२०२१)