‘२.१.२०२२ या दिवशी मार्गशीर्ष मास समाप्त होत आहे आणि ३.१.२०२२ या दिवसापासून पौष मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. ३.१.२०२२ पासून पौष मास आणि शुक्ल पक्ष चालू होणार आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. दर्श-वेळा अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) ‘दर्श’ संज्ञक मानतात. मार्गशीर्ष मासातील अमावास्येला दर्श-वेळा अमावास्या म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतातील धान्यलक्ष्मीचे पूजन करतात. खेडोपाडी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. रविवार, २.१.२०२२ या दिवशी पहाटे ३.४२ पासून रात्री १२.०४ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.
२ आ. मृत्यूयोग : रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी आश्लेषा आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘मृत्यूयोग’ होतो. हा योग प्रयाणास किंवा कोणत्याही शुभ कार्यास वर्ज्य करावा. सोमवार, ३.१.२०२२ या दिवशी दुपारी १.३३ पासून उत्तराषाढा नक्षत्र असल्याने मंगळवारी सूर्याेदयापर्यंत मृत्यूयोग आहे.
२ इ. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे प्रथम दर्शन ‘चंद्रकोर’ रूपात होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ‘ब्रह्मा’ आहे. ४.१.२०२२ या दिवशी रात्री ८.०६ पर्यंत चंद्रदर्शन आहे.
२ ई. दग्धयोग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्धयोग होतो. दग्धयोग हा अशुभयोग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. ५.१.२०२२ या दिवशी बुधवार असून दुपारी २.३५ पर्यंत तृतीया तिथी असल्याने ‘दग्धयोग’ आहे.
२ उ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. ५.१.२०२२ या दिवशी उत्तररात्री १.२७ पासून ६.१.२०२२ या दिवशी दुपारी १२.३० पर्यंत विष्टी करण आहे.
२ ऊ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ७.१.२०२२ या दिवशी सकाळी ११.११ पासून ८.१.२०२२ या दिवशी सकाळी ६.२० पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ए. बांगरषष्ठी : पौष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला ‘बांगरषष्ठी’ म्हणतात. ८.१.२०२२ या दिवशी बांगरषष्ठी आहे. या दिवशी ‘षष्ठीदेवी स्तोत्र’ वाचतात.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.१२.२०२१)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – दर्श अमावास्या, अन्वाधान, इष्टी, दग्धयोग, भद्रा (विष्टी करण), घबाड मुहूर्त आणि विनायक चतुर्थी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – बाजूल्या दिलेल्या सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांचे पुढील वचन लक्षात ठेवावे. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो. |