सेवेची तळमळ असणार्या आणि साधनेचा ध्यास असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डिगस, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील कै. जयश्री दिगंबर सुर्वे (वय ७१ वर्षे) !
२२.१२.२०२१ या दिवशी श्रीमती जयश्री सुर्वे यांचे हृदयविकाराने निधन झाले. १.१.२०२२ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सौ. पल्लवी शिरोडकर (मुलगी), ढवळी, फोंडा, गोवा.
१. लहानपणापासून साधनेचे संस्कार करणे : ‘मी लहान असतांना आई कुटुंबीय आणि शेजारी यांना एकत्रित करून श्रीमद्भगवद्गीता अन् दासबोध यांचे वाचन करत असे. ती प्रतिदिन ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचनही आम्हाला समवेत घेऊन वाचत असे. अध्यात्म किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रवचने आणि व्याख्याने असल्यास ती आम्हाला समवेत नेत असे. त्यामुळे आमच्यावरही तसे संस्कार होऊन आम्हाला धर्माविषयी आवड निर्माण झाली आणि साधनेची गोडी लागली.
२. मुलीला साधनेत साहाय्य करणे : आई नेहमी इतरांचा विचार प्रथम करायची. आईने मला साधनेसाठी नेहमीच साहाय्य केले. मला कधी कधी डिगस, कुडाळ येथे जाणे शक्य नसायचे. तेव्हा ती मला सांगायची, ‘‘तू सेवेला आधी प्राधान्य दे.’’
३. सेवेची तळमळ : तिने या वयातही सेवेसाठी भ्रमणभाषमधील उपयुक्त नवीन ‘ॲप’ शिकून घेतले होते. डिगस (कुडाळ) येथील आमच्या घरी तिने बालसंस्कार वर्ग चालू केले होते. वाडीतील मुलांना एकत्र करून ती स्तोत्रे शिकवायची आणि अन्य नातेवाईकांना साधनेचे महत्त्व सांगायची. त्यामुळे वाडीतील काही जण नामजप करू लागले आहेत आणि ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करत आहेत. वाडीतील लोक हिंदु राष्ट्र-जागृती सभेलाही जातात.
४. जाणवलेले पालट : आईच्या निधनाच्या आधी ४ दिवस आम्ही तिच्या समवेत होतो. तेव्हा आम्हाला तिच्यात चांगले पालट जाणवले. तिच्या तोंडवळ्यावर तेज जाणवत होते. ती शांत झाल्यासारखे वाटत होती. घरातील वातावरण अजून शांत आणि सात्त्विक वाटत होते.
५. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आईचा मृत्यूनंतरचा प्रवास चांगला होणार असल्याचे जाणवून स्थिर राहून पुढील कर्तव्यकर्मे करता येणे : मला रात्री आईचे निधन झाल्याचे समजले. तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला, ‘आई आनंदात आहे. तिला काही त्रास नाही. परात्पर गुरुदेवांचा हात धरून तिचा पुढील प्रवास चालू होणार असल्याने ती आनंदात आहे.’ त्यामुळे मी परात्पर गुरुदेवांच्या कृपेने स्थिर राहून पुढील कर्तव्यकर्मे करू शकले.
‘साधनेत असल्यावर गुरु कशी तुमची काळजी घेतात आणि पुढील प्रवास कसा सुखकर करतात’, याचे देवाने आईचे मूर्तीमंत उदाहरण आमच्यासमोर ठेवले आहे. यासाठी आम्ही सर्वजण परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
श्री. नीलेश शिरोडकर (जावई), शार्लेट, नॉर्थ कॅरोलायना, अमेरिका.
१. प्रेमभाव : ‘माझ्या सासूबाईंना (आईंना) सगळ्यांविषयी पुष्कळ प्रेम होते.
२. आईंच्या मनात सतत साधनेचाच विचार असल्याने वास्तू चैतन्यमय वाटणे : त्या ७१ वर्षांच्या असल्या, तरी कुडाळ येथील घरात त्या एकट्याच रहायच्या. त्या प्रसारसेवा करायच्या. त्या क्वचित्च थकलेल्या दिसायच्या. त्यांच्या मनात ‘अध्यात्म, गुरूंचे मार्गदर्शन, साधक, हिंदु राष्ट्र’, असे विचार असायचे. त्यामुळे ‘त्यांची वास्तू चैतन्यमय झाली आहे’, असे वाटते.
३. शेवटच्या श्वासापर्यंत नामजप करणे : २२.१२.२०२१ या दिवशी रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात न्यावे लागले. त्या वेळी त्या गुरुदेवांचे नाव घेत होत्या. त्यांनी शेवटपर्यंत नामजप केला. ‘त्या शेवटच्या क्षणापर्यंत आध्यात्मिक स्तरावरच विचार करत होत्या’, हे शिकायला मिळाले.
४. आईंच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. त्या शांत आणि समाधानी दिसत होत्या. त्यांचा तोंडवळा लहान मुलासारखा दिसत होता.
आ. त्यांच्यात आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह जाणवत होता.’
चि. साहस शिरोडकर (नातू, वय १७ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा.
१. चुकांमधून शिकून पुढे जाण्यासाठी नातवाला प्रेरणा देणे : ‘एकदा माझ्याकडून झालेल्या काही चुकांमुळे मला वाईट वाटत होते. मी त्या संदर्भात आजीशी बोललो. तेव्हा ती म्हणाली, ‘‘दुःखी होऊ नकोस. तू चुकांमधून शिकायला हवेस. गुरु किंवा ईश्वर चुकांमधून शिकण्यासाठी प्रसंग निर्माण करतात. काळजी करू नकोस. तू त्यांना ‘माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी प्रार्थना कर.’’ तिच्याशी बोलल्यानंतर मला बरे वाटले आणि प्रयत्न चालू ठेवण्याची प्रेरणा मिळाली.
२. शेवटच्या श्वासापर्यंत साधना करण्याचे उदात्त ध्येय असणे : एकदा मी तिला विचारले, ‘‘आजी, तुझे आयुष्यातील ध्येय काय आहे ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘मला शेवटच्या श्वासापर्यंत साधनाच करायची आहे.’’
३. घर आश्रमाप्रमाणे जाणवून देवघरातील छायाचित्रांत पालट जाणवणे : आजीचे घर लहान आश्रम असल्याप्रमाणेच वाटते. घर आणि सभोवतालचा परिसर यांतील स्पंदने चांगली वाटतात. एकदा मी आजीच्या घरी नामजपादी आध्यात्मिक उपाय करत होतो. तेथे देवघरात ठेवलेल्या चित्रांमध्ये मला काही आश्चर्यकारक पालट दिसले. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रातील त्यांच्या पांढर्या रंगाच्या सदर्याचा रंग गुलाबी झाला होता. त्यांच्या गळ्यावर ‘ॐ’ उमटला होता. मला प.पू. भक्तराज महाराज यांचे चित्र सजीव जाणवत होते. भगवान श्रीकृष्णाच्या चित्रात त्याच्या डोक्याच्या आजूबाजूला गुलाबी रंगाची आभा होती. परात्पर गुरुदेवांनी एका सत्संगात सांगितले होते, ‘‘जेव्हा पूजा करणार्या साधकामध्ये भाव असतो, तेव्हा देवतांच्या चित्राचा रंग पालटतो.’’
४. आजीच्या अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. आजीचे अंत्यविधी चालू असतांना मला तिचा तोंडवळा आनंदी दिसला. तेव्हा मला वाटले, ‘गुरु तिची काळजी घेत आहेत. ती आनंदात आहे. तिच्या तोंडवळ्यावर तेज आहे’, असे मला जाणवले.
आ. तिचा मृतदेह उत्तर-दक्षिण दिशेला ठेवण्यात आला होता. त्याच्या शेजारी २ उदबत्या लावल्या होत्या. तेव्हा वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वहात होता; मात्र उदबत्तीचा धूर उत्तर दिशेला, म्हणजेच आजीचा मृतदेह ठेवलेल्या दिशेकडे वहात होता. हे पाहिल्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘केवळ गुरुच आजीच्या देहाला नकारात्मक शक्तींपासून वाचवत आहेत.’
(‘मृत्यू झाल्यानंतर देहातून पंचप्राण आणि पंचउपप्राण बाहेर पडत असतात. त्यांच्याकडे आकर्षित होऊन वाईट शक्ती मृतदेहावर आक्रमण करू शकतात. वाईट शक्तींचे आक्रमण होऊ नये, यासाठी सात्त्विक उदबत्तीचा धूर मृतदेहाच्या दिशेने गेलेला आढळला. – संकलक)
इ. आजीचे निधन झाल्यानंतर तिचे अंत्यविधी होईपर्यंत सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम पूर्णवेळ घरी थांबले होते. त्यामुळे ‘गुरुदेवच इकडे आहेत’, असे मला वाटले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २८.१२.२०२१)
उतारवयातही तळमळीने सेवा करणार्या आणि नातेवाईकांना साधना करायला प्रवृत्त करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या डिगस, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील कै. जयश्री दिगंबर सुर्वे (वय ७१ वर्षे) !
श्री. गजानन मुंज, ओरोस
१. उतारवयातही उत्साहाने सेवा करणे : ‘सुर्वेकाकू ७१ वर्षांच्या होत्या; मात्र त्यांचा सेवेचा उत्साह आम्हा सर्व साधकांना आदर्शवत होता. त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवली होती. ३.१२.२०२१ या दिवशी डिगस येथे जत्रा मोहीम झाली. त्यावेळी सुर्वेकाकूंनी दैनिक ‘सनातन प्रभात’साठी एकटीने विज्ञापने घेतली आणि त्या सगळ्यांची वेळेत वसुलीही केली. त्यांचे यजमान कै. दिगंबर सुर्वे यांचे ३ वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. त्यानंतर काकूंनी सुर्वेकाकांच्या परिचित व्यक्तींना संपर्क केले. काकूंनी त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीला साधनेशी जोडून ठेवले आहे.
२. नातेवाईकांना साधना करायला प्रवृत्त करणे : त्यांचे अनेक नातेवाईक वसई (जिल्हा पालघर) येथे रहातात. सुर्वेकाकू त्यांच्याकडून गुरुपौर्णिमेनिमित्त आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकासाठी विज्ञापने घ्यायच्या. या वर्षी त्यांनी नातेवाईकांना प्रवचन ऐकण्यासाठी उद्युक्त केले. त्यांनी काही जणांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदारही केले. सुर्वेकाकू घरी एकट्याच असायच्या. त्या वेळी त्यांचे भाऊ कधी कधी त्यांच्याकडे ४ ते ८ दिवस रहायचे. काकूंनी त्यांनाही साधना सांगितली. संध्याकाळी व्यष्टी साधनेचा आढावा सत्संग असतांना काकूंचे भाऊही आढावा सत्संग ऐकायचे. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘ताई, तू एवढी सेवा करतेस, तर मीही आता सेवा करतो.’’ काकूंच्या भावानेही मित्रांकडून अर्पण आणि गुरुपौर्णिमेनिमित्त विज्ञापने मिळवली.’
सौ. जान्हवी सावंत, ओरोस
‘मार्गशीर्ष मासात सुर्वेकाकूंचे निधन झाल्याने भगवान विष्णूने त्यांना आपल्यात सामावून घेतले असावे’, असे वाटणे : ‘काकूंचे निधन झाल्याचे समजल्यानंतर माझ्या मनात विचार आले, ‘काकूंचे ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ मुखोद्गत होते. त्या प्रतिदिन त्याचे पठण करायच्या. ‘मार्गशीर्ष मासात काकूंचे निधन होणे, हे जणू भगवान विष्णूने त्यांना आपल्यात सामावून घेतले असावे.’ प्रत्यक्ष भगवंताने श्रीमद्भगवतगीतेत अध्याय १० श्लोक ३५ मध्ये ‘मासानां मार्गशीर्षोऽहम् ।’, म्हणजे ‘मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे’, असे म्हटले आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २८.१२.२०२१)
|