‘३१ डिसेंबर’च्या नावाखाली चालणार्‍या अपप्रकारांना प्रतिबंध घाला !

जळगाव आणि नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची मागणी

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

जळगाव, २९ डिसेंबर, (वार्ता.) – ‘३१ डिसेंबर’च्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या अपप्रकारांवर, तसेच फटाके फोडण्यावर प्रतिबंध घालावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकारी, तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. जळगाव जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने श्रीमती भारंबे यांनी, नंदुरबार जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी, तर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी निवेदन स्वीकारले.

नंदुरबार येथील जिल्हाधिकार्यांनना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

या निवेदनात म्हटले आहे की, ३१ डिसेंबरच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान अन् मेजवान्या करण्यावर प्रतिबंध आणावा, पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी. या अपप्रकारांच्या माध्यमातून कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होते, तसेच त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांच्यावर येतो. देशाची युवा पिढी नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी या सर्व सूत्रांचा गांभीर्याने विचार करून सामाजिक आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.