|
मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहात क्षमा मागावी किंवा त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. या वेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे सदस्य हरिभाऊ बागडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी विधानसभेच्या अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत येऊन सत्ताधारी आणि विरोधक यांनी घोषणा दिल्याने सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले.

प्रारंभी नाशिक येथील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे म्हणाले की, यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी ‘पुन्हा पुन्हा मी असे बोलणार आहे’, असे म्हटले होते. शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच त्यांचे नातू आदित्य ठाकरे हेही आमच्यासाठी दैवत आहे. त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा खपवून घेतली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अंगविक्षेप करून वक्तव्य केल्यानंतर भास्कर जाधव यांनी क्षमा मागितली होती. आता नितेश राणे यांनी तात्काळ क्षमा मागावी अथवा त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी त्यांनी मागणी केली. शिवसेनेचे सदस्य सुनील प्रभु यांनी कांदे यांचे समर्थन केले.
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, आमदार सुनील प्रभु यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उपदेश केला. असे वर्तन करू नये असे त्यांच्या पक्षातील नेतेही म्हणाले होते. तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते. त्यामुळे अशा सदस्याला कायमस्वरूपी निलंबित करावे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही. यापूर्वी सदस्य भास्कर जाधव अन्न आणि प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांना पाहून ‘हुप हुप’ करत होते. एखाद्या आमदाराला ठरवून निलंबित करणार असू, तर ते लोकशाहीला धरून नाही. आधी तुम्ही भाजपचे १२ आमदार १ वर्षासाठी निलंबित केले. आमच्यावर कितीही निलंबनाची कारवाई झाली, तरी आम्ही लढू. सरकारे पालटत असतात. एकदा जर तुम्ही पायंडा पाडला, तर पुढील काळात विरोधक उरणार नाहीत आणि लोकशाहीची हत्या होईल. आमचे १२ सदस्य निलंबित झाले असून आम्हाला सर्वाेच्च न्यायालयात गेल्याचा आनंद नाही. आमच्यावर ही वेळ आणली जात आहे. येथे कायदा आणि संविधान मानले जात नाही. १-१ वर्ष निलंबन करणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
यानंतर तालिका अध्यक्षांनी ‘सभागृहाचे कामकाज संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. सभागृहात गोंधळ चालतो, अशी त्यांची भावना होऊ नये. बैठक घेऊन या विषयावर चर्चा करू’, असे त्यांनी सांगितले.
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम भूमी घोटाळ्याच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin