‘दोन्ही हात आकाशाच्या दिशेने झाल्यावर होणारी मुद्रा’ आणि ‘नमस्काराची मुद्रा’ यांतून मिळणार्‍या ऊर्जेच्या स्रोतामध्ये साधकाला जाणवलेला भेद !

श्री. मुकुंद ओझरकर

१. दोन्ही तळहात आकाशाच्या दिशेने झाल्यावर ऊर्जेचा मोठा स्रोत बोटांच्या माध्यमातून शरिरात जात असल्याचे जाणवणे

‘प्रार्थना करतांना हात जोडले की, त्या मुद्रेतून ईश्वरी शक्ती मिळते’, हे शास्त्र मला ठाऊक आहे. एकदा मी सहज हात चोळत असतांना माझ्या दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने झाले आणि अन्य पथियांच्या प्रार्थनेच्या वेळी दोन्ही हातांची जशी स्थिती असते, त्याप्रमाणे माझ्या हातांची स्थिती झाली. त्या वेळी ऊर्जेचा मोठा स्रोत हातांच्या बोटांच्या माध्यमातून माझ्या शरिरात जात होता आणि मला पुष्कळ संवेदना जाणवत होत्या. मी १ – २ वेळा हा प्रयोग पुन्हा करून बघितला आणि मला पुन्हा तोच अनुभव आला.

२. नमस्काराची मुद्रा केल्यावर अवकाशातून येणार्‍या ऊर्जेच्या स्रोताची गती मंदावून आनंदाच्या लहरी जाणवू लागणे

त्यानंतर मी नमस्काराची मुद्रा केली. त्या वेळी अवकाशातून येणार्‍या शक्तीचे प्रमाण एकदम घटले आणि दोन्ही प्रकारच्या स्पंदनांमध्ये मला भेद जाणवला. मी पुनःपुन्हा हा प्रयोग केला आणि ‘असा भेद का जाणवत असावा ?’, याचे निरीक्षण केले. तेव्हा मला जाणवले, ‘तळहात आकाशाच्या दिशेने केल्यावर जी मुद्रा होते, तिच्यातून मिळणारी ऊर्जा तीव्र स्वरूपाची आणि रजोगुणी असावी; कारण तिच्यातून आनंद मिळत नव्हता. नमस्काराची मुद्रा केल्यावर ऊर्जेच्या स्रोताची गती मंदावली; पण आनंदाच्या लहरी जाणवू लागल्या.’

‘सत्त्वलहरी प्राप्त करण्याच्या मुद्रेचा शोध लावून ऋषिमुनींनी आपला हिंदु धर्म किती उच्च स्थानी नेऊन ठेवला आहे !’, हे माझ्या लक्षात आले आणि माझ्याकडून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (१५.४.२०१९)

शंका : ‘सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मी.. ’ हा श्लोक म्हणतांना आपले हात उघडलेल्या स्थितीतच असतात. मग ते कसे ?’ – सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी

उत्तर : ‘कराग्रे वसते लक्ष्मी.. ’ हा श्लोक म्हणतांना तळहात पूर्णपणे आकाशाच्या दिशेने नसतात, तर ते श्लोक म्हणणार्‍या व्यक्तीने करदर्शन करण्यासाठी स्वतःच्या पुढ्यात उघडलेले असतात. त्यामुळे अशा हस्तस्थितीत ऊर्जेचा मोठा स्रोत बोटांच्या माध्यमातून येत नाही.’ – संकलक