अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरत असतांना १२ आमदारांचे निलंबन मागे केव्हा घेणार ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न

श्री. सुनील घनवट, मुंबई.

मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – ‘रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम ठरत आहे. मग निलंबित केलेल्या विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे केव्हा घेणार ?’, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २४ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित केला.

निलंबित १२ आमदारांच्या सूत्रावर विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी निवेदन केले. यानंतर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाविषयी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. या प्रकरणी आपण परब यांच्यावर हक्कभंग आणणार आहे, अशी चेतावणी मुनगंटीवार यांनी अधिवेशनात दिली.

या वेळी ते म्हणाले की, अधिवेशन चालू असतांना अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे, हे बाहेरून समजते; मात्र सभागृहात माहिती मिळत नाही. १२ आमदार निलंबित असतांना त्यांचा विचार न करता थेट निवडणूक घेतली जाते. अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच असेल, तर अगोदर १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे.

यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही १२ आमदारांच्या निलंबनाचे सूत्र उपस्थित केले. ‘त्यांचे निलंबन केव्हा मागे घेणार ?’, असा प्रश्न उपस्थित केला. यावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब म्हणाले, ‘‘मुनगंटीवार हे या सदनाचे अनुभवी सदस्य आहेत. त्यांना हे माहिती नाही का ? अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम विधानसभेत घोषित केला जातो. विधानसभेचे कामकाज चालू आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात येईल, अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. जेव्हा अधिकृत कार्यक्रम घोषित होईल, तेव्हा तशी घोषणा केली जाईल.