‘मार्गशीर्ष मास ५.१२.२०२१ या दिवसापासून चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
२. शास्त्रार्थ
२ अ. भानुसप्तमी : रविवारी येणार्या सप्तमीला ‘भानुसप्तमी’ म्हणतात. या दिवशी सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व असते. या दिवशी सूर्याेदयसमयी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि गायत्री मंत्र म्हणावा. २६.१२.२०२१ या दिवशी भानुसप्तमी आहे.
२ आ. अमृतयोग : नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. रविवारी हस्त नक्षत्र, सोमवारी मृग नक्षत्र, मंगळवारी अश्विनी नक्षत्र, बुधवारी अनुराधा नक्षत्र, गुरुवारी पुष्य नक्षत्र, शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल, तर ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. अमृतयोगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. सोमवार, २७.१२.२०२१ या दिवशी पहाटे ५.२५ पासून हस्त नक्षत्र असल्याने सोमवारी सूर्याेदयापर्यंत अमृतयोग आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’, असे म्हणतात.
१. २६.१२.२०२१ या दिवशी सकाळी ८.१४ पर्यंत विष्टी करण आहे.
२. २९.१२.२०२१ या दिवशी पहाटे ५.१६ पासून २९.१२.२०२१ या दिवशी दुपारी ४.१३ पर्यंत विष्टी करण आहे.
३. १.१.२०२२ या दिवशी सकाळी ७.१८ पासून सायंकाळी ५.३१ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २८.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.१० पासून २९.१२.२०२१ या दिवशी पहाटे ४.११ पर्यंत आणि २९.१२.२०२१ या दिवशी पहाटे ६.०१ पासून दुपारी ४.१३ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ उ. सफला एकादशी : मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशीला ‘सफला एकादशी’ म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूच्या नारायण रूपाची पूजा करतात. या एकादशीला दीपदान करतात. रात्री जागून श्रीविष्णूचे नामस्मरण आणि कीर्तन करावे. या दिवशी ‘एकादशी माहात्म्य’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांचे वाचन करतात. या एकादशीच्या व्रतामुळे श्रीहरीची कृपा होते, राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होते आणि पुण्य मिळते. ३०.१२.२०२१ या दिवशी सफला एकादशी आहे.
२ ऊ. शुक्र किंवा भृगु प्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण पक्ष त्रयोदशीला ‘प्रदोष’, असे म्हणतात. शुक्रवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘शुक्रप्रदोष’ किंवा ‘भृगुप्रदोष’ म्हणतात. ३१.१२.२०२१ या दिवशी शुक्रप्रदोष आहे. जीवनातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, तसेच वैवाहिक सुखासाठी ‘भृगुप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी
सायंकाळी शिवपूजन करावे, तसेच शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.१२.२०२१)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.
टीप २ – अमृतयोग, भद्रा (विष्टी करण), कालाष्टमी, घबाड मुहूर्त, एकादशी, प्रदोष, शिवरात्री आणि क्षयदिन यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |