छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविषयी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत कर्नाटक सरकारचा निषेध !

एकनाथ शिंदे

मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी २२ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीचे निवेदन सभागृहात मांडले.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर वारंवार अन्याय करत आहे. स्थानिक मराठी जनतेची मुस्कटदाबी करणे, मराठी पाट्या हटवणे, मराठी शाळा बंद पाडणे, कन्नड भाषेची सक्ती करणे असे प्रकार कर्नाटक राज्यात घडत आहेत. या विरोधात आंदोलन करणार्‍या मराठी माणसांची दडपशाही करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाची घटना आम्ही सहन करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अवमानाप्रकरणी कर्नाटक सरकारचा मी जाहीर निषेध करतो.’’

याविषयी सभागृहाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘जेथे महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान येतो, तेथे पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही विचार करणारे आहोत. त्यामुळे राजकारण करून याविषयाचे गांभीर्य न्यून करू नये.’’