|
मुंबई – बेंगळूरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरातून त्याचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीने या घटनेचा लोकशाही मार्गाने निषेध केला. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला असेल, तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करावी; मात्र समितीच्या २०० कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांकडून बळजोरीने अटक करण्यात आली. त्यांना बेदम मारहाण आणि त्यांच्यावर लाठीमारही केला गेला. याविषयी महाराष्ट्र्रातील भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहेत ? कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालूनच दाखवावी, असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिले आहे. देहली येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या वेळी ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी बांधवांच्या संघर्षाचे गेल्या ७० वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे. त्यांनी यासाठी आंदोलनेही केली आहेत. समितीने यासाठी रक्त सांडले, बलीदानही दिले आहे.’’