संपादकीय
जात-पात, पक्ष, संघटना यांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राला वंदनीय व्यक्तीमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराष्ट्रातील विरांच्या तलवारी मोगलांच्या चाकरीमध्ये लागल्या असतांना छत्रपतींनी मराठ्यांचा स्वाभिमान जागृत केला. प्रत्येक स्वाभिमानी हिंदूला शिवरायांच्या या शौर्याची जाण आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना ही जाण असल्याचे दिसत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राजकीय टीका करतांना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदुत्वाशी संबंध जोडणे म्हणजे त्यांच्या महान कर्तृत्वाचा अपमान होय’, अशी मुक्ताफळे लोंढे यांनी उधळली.
चंद्रकांत पाटील यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्मसमभावाची नाही’, या वक्तव्यावर लोंढे यांचे पुरोगामित्व दुखावले गेले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही काँग्रेसच्या पंगतीत बसवण्याचा अश्लाघ्य प्रकार केला. ‘छत्रपती शिवराय कर्मकांड मानणारे नव्हते’, असेही त्यांनी वक्तव्य केले. बालभारतीच्या इयत्ता ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी या पाठ्यपुस्तकातील अफझलखानाचा कोथळा काढणारे छत्रपतींचे छायाचित्र वगळून अफझलखानाची भेट घेणारे छायाचित्र आणणार्या हरि नरके आदी स्वयंघोषित इतिहासकारांच्या विकृत पुस्तकांचे वाचन करून लोंढे बरळत आहेत का ? शिवरायांच्या सैन्यात मुसलमान असल्याचे दाखले देऊन लोंढे यांनी शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा आटापिटा केला आहे. त्यासाठी मुसलमान नसलेल्या मदारी मेहतर यांचाही उल्लेख त्यांनी ‘मुसलमान’ म्हणून केला आहे. छत्रपतींना ‘सर्वधर्मसमभावी’ ठरवण्याचा हा काही पहिला प्रयत्न नाही. याआधीही असले प्रकार घडले आहेत. प्रखर हिंदुत्वनिष्ठ ज्यांना आदर्श मानतात, अशा राष्ट्रपुरुषांनी घडवलेल्या इतिहासाची मोडतोड करून त्यांना ‘पुरोगामी’ किंवा ‘सर्वधर्मसमभावी’ ठरवण्याची टूम हल्ली निघाली आहे. असे करून हिंदुत्वनिष्ठांचे खच्चीकरण करण्याचा किंवा त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न होतो. आताही लोंढे हेच करतांना दिसत आहेत. छत्रपतींचा खोटा इतिहास सांगून हिंदुत्वनिष्ठांचे हिंदुत्व पातळ करायला निघालेले लोंढे यांच्यासारखे करत असलेले वैचारिक प्रदूषण रोखणे अपरिहार्य आहे.
काँग्रेसवाल्यांचा ‘सर्वधर्मसमभावा’शी संबंध नाही !
शाहबानो प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाचा पोटगी देण्याचा निकाल इस्लामच्या विरुद्ध असल्यामुळे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पोटगीचा कायदा पालटला होता. रामसेतूचे अस्तित्व काँग्रेसनेच सर्वाेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राने अमान्य केले; मात्र त्याच काँग्रेसच्या नेत्यांनी धर्मांध बाबराच्या नावाने असलेल्या बाबरी ढाच्याच्या पतनाविषयी नकाश्रू ढाळले. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करून त्यांतील पैसा घेतला; पण तो वेदपाठशाळेसाठी, हिंदूंच्या यात्रांसाठी दिला नाही, तर हजयात्रेसाठी अनुदान दिले. अशा काँग्रेस नेत्यांच्या तोंडी खरे तर ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्दच शोभत नाही.
सर्वधर्मसमभाव हा हिंदुत्वातच आहे !
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदुत्वाशी संबंध जोडणे म्हणजे धर्मांधता’, असे लोंढे यांना म्हणायचे आहे का ? लोंढे यांना ते काय बरळत आहेत, हे तरी कळत आहे का ? ‘हिनानी गुणानी दुषयती इति हिंदु’, अशी हिंदुत्वाची व्याख्या ‘मेरुतंत्र’ या प्राचीन ग्रंथामध्ये दिली आहे. ‘जो हीनतम गुणांचा त्याग करतो तो हिंदु’ असा याचा अर्थ आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ अशी हिंदुत्वाची व्यापक संस्कृती आहे. लोंढे यांना राजकीय टीका करायची असल्यास त्यांनी ती अन्य पक्षांवर करावी; मात्र हिंदुत्वाविषयी अज्ञान पाजळू नये.
होय, छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य हे हिंदूंचेच साम्राज्य !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा ध्वज भगवा होता. त्यांनी सप्तनद्यांच्या अभिषेकाने वेदमूर्ती ब्राह्मणांकडून राज्याभिषेक करवून घेतला. प्रत्येक गडावर कुलस्वामिनी श्री भवानीदेवीची स्थापना त्यांनी केली. या इतिहासाची साक्ष आजही आहे. असे असतांना लोंढे कसे काय म्हणण्यास धजावतात की, छत्रपती शिवाजी महाराज कर्मकांड मानणारे नव्हते. कर्मकांड हा हिंदु संस्कृतीमधील एक अविभाज्य भाग आहे आणि त्याला शास्त्राधार आहे. लोंढे यांनी याचा अभ्यास करावा. ज्याविषयी ठाऊक नाही, त्यावर बोलण्याने स्वत:चे अज्ञान प्रकट होते, याची जाण असलेल्यांना तरी काँग्रेसने प्रवक्ते नेमावे. बळजोरीने इस्लाम हा पंथ स्वीकारून ‘महंमद कुली खान’ झालेल्या नेताजी पालकर यांना महाराजांनी पुन्हा हिंदु धर्मात घेतले. व्यापाराच्या नावाने हिंदूंना बाटवणार्या ख्रिस्त्यांचा महाराजांनी शिरच्छेद केला. हिंदुत्वाचा वीररस असलेल्या त्यांच्या छाव्याने मृत्यूला कवटाळले; पण इस्लाम स्वीकारला नाही. हे हिंदुत्व मुसलमानांचे लांगूलचालन करणार्या लोंढे यांना काय कळणार ? लोंढे यांच्या पक्षाने महाराष्ट्रात ज्यांच्याशी आघाडी केली आहे, त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून समस्त हिंदु समाज आपला नेता मानतो. त्या बाळासाहेबांचा ‘हिंदुत्व’ हाच आत्मा होता, हे तरी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आठवते का ?
तत्कालीन महाकवी भूषण यांनी ‘शिवाजी राजे न होते तो, सुन्नत होती सबकी’ असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन केले आहे. कवी भूषणलिखित शिवाबावनीमध्ये ‘वेद राखे विदित पुराने राखे सारयुत, राम नाम राख्यों अति रसना सुधार मैं, हिंदूंन की चोटी रोटी राखी है सिपहिन की, कांधे में जनेऊ राख्यो माला राखी गर मैं’ असे शिवरायांचे वर्णन केले आहे. त्यामुळे वैचारिक सुंता झालेल्या काँग्रेसींनी कितीही बांग दिली, तरी छत्रपती शिवाजी महाराज हे ‘हिंदुपदपातशाह’च आहेत, हेच त्यांनी लक्षात घ्यावे !