छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे सातारा जिल्ह्यात पडसाद !

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे १७ डिसेंबरच्या रात्री काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली. याचे पडसाद सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. शहरातील शिवतीर्थावर एकत्र जमत शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या वेळी विविध घोषणा देण्यात आल्या. या वेळी संबंधित समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली.

कराड येथेही तालुक्यातील शिवप्रेमींनी दत्त चौकात एकत्र येऊन शिवप्रभूंच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आणि महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांना अटक करण्याची मागणी केली.

‘त्या’ समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करा ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार

कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेची संतापजनक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची अस्मिता आहे. कर्नाटकमधील या दुष्कृत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, तसेच संबंधित समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.