संतवचने ः लोकशिक्षण देणारे ज्ञानभांडार !

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. प्रचीन काळापासून महाराष्ट्राला अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. या संतांनी वेळोवेळी लोकांना दिलेली शिकवण म्हणजे त्यांची अमृतवचनेच होत. संतवचनांतून पराभूतपणाची वृत्ती नाहीशी होऊन दैवी गुणांची जोपासना होण्यास साहाय्य होते. इतकेच नव्हे, तर जीवनात अंतर्बाह्य पालट होतात. म्हणूनच संतवचने ही सहजसोप्या भाषेत लोकशिक्षण देणारे ज्ञानभांडार आहे. प्रस्तुत लेखात आपण काही संतवचने पाहूया.

समर्थ रामदासस्वामी

१. समर्थ रामदासस्वामी

समर्थ रामदासस्वामी यांच्या मार्गदर्शनामुळे मानवास पराक्रम, समन्वयशीलता आणि सर्वसमावेशकता या गुणांची उदात्त शिकवण मिळते. समर्थांच्या अवतरणांतून (वचनांतून) समाजाला सत्वर राष्ट्रवादाची प्रेरणा मिळते. त्यांची काही अवतरणे (वचने) पुढीलप्रमाणे आहेत.

अ. मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा । आहे तितुके जतन करावे । पुढे आणिक मेळवावे ।
आ. आधी गाजवावे तडाखे । मग भूमंडळ धाके ।
इ. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयांचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥’
ई. देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनी घालावे परते ।
उ. लेकुरे उदंड झाली । तेणे लक्ष्मी पळून गेली ।

संत तुकाराम महाराज

२. संत तुकाराम महाराज

समर्थ रामदास स्वामी यांचे समकालीन संत तुकाराम महाराज काय म्हणतात,

‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ।’

अर्थ : आम्ही विष्णुदास मेणापेक्षाही मऊ आहोत आणि इंद्राच्या हातातील वज्र फोडून टाकण्याइतके कठीण आहोत.

यांसारख्या वचनांतून समाजमन घडवणे लीलया शक्य आहे. संतांचे जीवन आणि त्यांची वचने यांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन त्यांच्या दिव्य प्रकाशात समाजमन उजळून नाही निघाले, तरच नवल !

संत ज्ञानेश्वर महाराज

३. संत ज्ञानेश्वर महाराज

संतांची विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे स्वभाषेचा अभिमान ! संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कालखंडापर्यंत बहुतांश ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये उपलब्ध होते. संत ज्ञानेश्वर यांच्यापासून ते आधुनिक काळातील संतकवी दासगणू महाराज यांच्यापर्यंत सर्वच संतांनी अभंग, ओवी आदींच्या साहाय्याने मराठी भाषा समृद्ध केली. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

‘माझा मराठाचि बोलू कौतुकें । परि अमृतातेंही पैंजा जिंकें । ऐंसी अक्षरें रसिकें । मेळवीन ।।’

अर्थ : माझी ही भाषा प्राकृत आहे खरी; पण ती अमृतालाही पैज मारून जिंकील, अशी त्यात रसाळ शब्दांची योजना करीन.

यातून त्यांनी मातृभाषेची थोरवी सांगितली आहे आणि त्यांचे मराठी भाषेविषयी असलेले दृढ नाते अधोरेखित होते.

४. संत एकनाथ महाराज

संत एकनाथ महाराज तर त्याच्याही पुढे जाऊन विचारतात,

‘संस्कृत वाणी देवें केली । तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली ।’

अर्थ : संस्कृत भाषा देवाने केली आणि मराठी भाषा काय चोरांपासून निघाली ?

संत कबीर

५. संत कबीर

एकेश्वरवादाची मोलाची शिकवण संतांनीच दिली आहे. संत कबीरांचे वचन आहे –

‘गुरु गोविन्द दोऊ खडे, काके लागूं पांय ।
बलिहारी गुरु आपने, गोविन्द दियो बताय ।।’

अर्थ : गुरुदेव आणि गोविंद (ईश्वर) हे दोघे आपल्यासमोर उभे राहिल्यावर प्रथम कुणाचे चरण धरावे ?, तर गुरुदेवांचेच चरण धरावे, म्हणजे त्यांना प्रथम वंदन करावे; कारण गुरुदेवांच्या कृपेने गोविंद (ईश्वर) दर्शन देतो.

संत, संतवचने, संतकथा आणि चरित्र यांतून पराभूतपणाची वृत्ती नाहीशी होऊन प्रतिकूल परिस्थितीला कणखरपणाने तोंड देण्याची समाजाची सिद्धता होते. याशिवाय अंतःर्शुद्धी, कर्तव्यनिष्ठा, भूतदया, क्षमाशीलता, परोपकार आदी दैवी गुणांची जोपासना करण्यासही साहाय्य होते.’

– श्री. प्र. दि. कुलकर्णी, पंढरपूर (२२.७.२०१७)