अलप्पुळा (केरळ) येथे १२ घंट्यांत भाजप आणि एस्.डी.पी.आय. यांच्या नेत्यांची हत्या

केरळमधील माकप सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

डावीकडे अधिवक्ता रणजित श्रीनिवास

अलप्पुळा (केरळ) – अलप्पुळा जिल्ह्यात केवळ १२ घंट्यांमध्ये दोन नेत्यांच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येथे १८ डिसेंबरच्या रात्री जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (‘एस्.डी.पी.आय.’चे) राज्य सचिव के.एस्. शान या नेत्याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे १९ डिसेंबरला सकाळी भाजपचे ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि अधिवक्ता रणजित श्रीनिवास यांची हत्या करण्यात आली. ते सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला जाण्यासाठी सिद्ध होत असतांना त्यांच्या घरातच त्यांची हत्या करण्यात आली. राज्यात या वर्षीच्या एप्रिल मासात झालेल्या विधानसभा निवडणुकीत रणजित यांनी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

१. के.एस् शान मोटार सायकलवरून घरी परतत असतांना एका चारचाकीने त्यांना धडक दिली. यानंतर त्यांच्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले. यात घायाळ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

२. या हत्येनंतर पोलिसांनी जिल्ह्यामध्ये कलम १४४ (जमावबंदीचा आदेश) जारी केला आहे. वाहतूक तपासणीत वाढ करण्यात आली आहे.

३. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी राज्यातील माकप आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ केरळ सरकारवर देवभूमी असलेल्या देशाला जिहाद्यांचा ‘स्वर्ग’ या रूपात पालटण्याचा प्रयत्न होत आहे.’ केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन् यांनीही या हत्यांचा निषेध केला आहे. केरळमध्ये गुंडाराज असल्याचा त्यांनी आरोप केला.

४. एस्.डी.पी.आय.चे प्रमुख एम्.के. फैझी यांनी ट्वीट करून ‘या घटना जातीय हिंसाचार निर्माण करण्याच्या आणि राज्यात सलोखा बिघडवण्याच्या संघ परिवाराच्या धोरणाचा एक भाग आहेत. आम्ही संघाच्या आतंकवादाचा निषेध करतो.’

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल ! – मुख्यमंत्री पिनराई विजयन्

मुख्यमंत्री पिनराई विजयन्

राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी या हत्येचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘‘अशी भीषण हिंसा आणि अमानवी कृत्य राज्यासाठी धोकादायक आहे. सर्व मारेकरी लवकरच पकडले जातील, याची मला निश्‍चिती आहे.’’