शेवगाव (जिल्हा नगर) येथील दत्तभूमीत दत्तजयंती सोहळा भक्तीभावात साजरा !
शेवगाव (जिल्हा नगर), १८ डिसेंबर (वार्ता.) – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येथील दत्तभूमीत दत्तजयंतीनिमित्त आयोजित सोहळा ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या जयघोषात भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य सोहळ्यात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले तसेच सनातन संस्थेचे साधक आणि प.पू. दादाजींची मनोभावे सेवा केलेले श्री. अतुल पवार संकलित ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ या ग्रंथाचे प्रकाशन कर्जत येथील दत्त-बालाजी देवस्थानचे महंत दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या सोहळ्याच्या प्रसंगी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे चिरंजीव पू. शरदकाका वैशंपायन आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. ललिता शरद वैशंपायन, तसेच श्री. अतुल पवार उपस्थित होते. ‘ॐ आनंदं हिमालयं’ संप्रदायाचे रवींद्र पुसाळकर, वृषाली पुसाळकर, राजेश मेसवानी, प्रा.के.एल्. पवार, नीला जोंधळे, पूजा रानडे आदी ज्येष्ठ साधक उपस्थित होते.
दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
दत्तजयंतीनिमित्त १७ आणि १८ डिसेंबर अशा दोन्ही दिवशी येथे दत्तयागाचेही आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६.३० वाजता मनोहारी संगमरवरी दत्तमूर्तीला ‘पंचसूक्त पवमाना’ने (विष्णु आदी देवतांची स्तुती असणारी सूक्ते म्हणत) अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सामूहिक मंत्रजप, तसेच श्री दत्तयाग पूर्णाहुती झाली. शैलेश जोशी, राहुल जोशी, श्रीपाद बिडेकर, तुकाराम चिक्षे आदी ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले. श्री. योगेश तायडे यांनी दत्तगुरूंची विविध पानाफुलांनी आकर्षक पूजा बांधली. दुपारी टाळमृदंगाच्या निनादात पालखी सोहळा पार पडला.
पानाफुलांनी सुशोभित पालखीमध्ये दत्तात्रेयांची उत्सवमूर्ती आणि ‘श्री गुरुचरित्र’ हा प्रासादिक ग्रंथ ठेवण्यात आला होता.
दत्तजयंतीचे औचित्य साधून श्री. गणेश गायकवाड यांनी २५ किलो वजनाच्या दोन पितळीच्या समया श्री दत्तात्रेय यांच्या चरणी अर्पण केल्या. गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष श्री. अर्जुनराव फडके आणि सचिव श्री. फुलचंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सेवाभावी कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
दत्त जन्मोत्सवाच्या पाळण्याची दोरी ओढल्यानंतर महाआरती झाली. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.
‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ या ग्रंथाचे मनोगत
‘ईश्वराचे सगुण रूप असलेल्या संतांचे या भूतलावरील कार्य परम कल्याणकारी असते. ‘मानवांना साधना करण्यासाठी प्रेरित करणे’, हे कार्य ते करतात. त्यांना साधकांचा उद्धार करण्याची तळमळच लागलेली असते. या तळमळीपोटी ते अध्यात्म, साधना इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शनही करतात. असेच मार्गदर्शन केलेली एक महान साक्षात्कारी विभूती म्हणजे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
योगतज्ञ दादाजी यांना वाचासिद्धि (बोलण्यानुसार घडणे) प्राप्त होती. ते आवश्यक तेवढेच आणि मोजक्या शब्दांत बोलत अन् तेच त्यांचे मार्गदर्शन ठरे. त्या मार्गदर्शनात अध्यात्माचे सारच येत असे. योगतज्ञ दादाजी यांच्या वाणीतील चैतन्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव उपस्थितांवर पडून त्यांपैकी अनेक जणांना योगतज्ञ दादाजी यांच्या दिव्यत्वाची प्रचीती आली आहे आणि अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ केली आहे.
योगतज्ञ दादाजी यांचे लिखाणही मोजक्या शब्दांत असे. त्यांनी वेळोवेळी विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके इत्यादींतून ‘जीवन कसे जगावे ?’, ‘साधना, भक्ती, विविध योगमार्ग यांचे महत्त्व’ इत्यादी अनेक विषयांवर लिखाण केले. हे लिखाण केवळ विविध साधनामार्गांनुसार साधना करणार्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांसाठीही उपयुक्त आहे. ‘या लिखाणातील ज्ञान अनुभूतीजन्य आहे’, असे जाणवते. या लिखाणावरून योगतज्ञ दादाजी यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीची कल्पनाही येते.
या ग्रंथात योगतज्ञ दादाजी यांचे मौलिक सुविचारही दिले आहेत. वाचकांनी प्रतिदिन यांतील १ सुविचार वाचावा, त्याचे चांगल्या प्रकारे मनन करावे, तो अंतःकरणात साठवावा आणि आचरणातही आणावा !
‘योगतज्ञ दादाजी यांची वाणी आणि लेखणी यांतून अवतरलेल्या या मार्गदर्शनरूपी ‘ज्ञानगंगे’चा लाभ अध्यात्ममार्गावर वाटचाल करणार्या प्रत्येक जिवास होऊ दे आणि त्या प्रत्येक जिवाकडून तसे आचरणही होऊ दे’, ही योगतज्ञ दादाजी यांच्या पवित्र चरणकमली प्रार्थना !’ – संकलक
योगतज्ञ दादाजी यांच्या मार्गदर्शनाचा प्रसार करण्याच्या संदर्भात दैवी शक्तींनी स्वप्नदृष्टांताद्वारे दिलेला संदेश !
‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची दैवी वाणी आणि लेखणी यांतून प्रगट झालेले मौलिक सुविचार अन् मार्गदर्शन प्रस्तुत ग्रंथाद्वारे जनमानसापर्यंत पोचवण्याचे कार्य करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.’ – दैवी शक्ती
(‘आज पहाटेच्या वेळी दैवी शक्तींनी स्वप्नदृष्टांताद्वारे मला वरील संदेश दिला. ‘या ग्रंथनिर्मितीसाठी आणि ग्रंथातील मार्गदर्शनाचा प्रसार होण्यासाठी दैवी शक्ती कशा कार्यरत आहेत’, हे यावरून लक्षात येते.’ – श्री. अतुल केशव पवार, २३.१०.२०२१)
महंत दयानंद महाराज कोरेगावकर यांचे ग्रंथाचे संकलक श्री. अतुल पवार यांच्याविषयी आशीर्वाचक उद्गार !दयानंद महाराज कोरेगावकर या वेळी श्री. अतुल पवार यांना उद्देशून म्हणाले, ‘‘तुमच्याकडून भविष्यात पुष्कळ चांगले कार्य होणार आहे.’’ |