शिवप्रतापदिनानिमित्त पुणे (कर्वेनगर) येथे ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’ आयोजित ‘शिवप्रताप’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा !
पुणे – आज देशामध्ये हिंदू सुरक्षित नाही. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु मुलींवर अत्याचार होत आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना नष्ट करण्याचे षड्यंत्र चालू आहे. मदरशांमधून मुलांना शिक्षण देण्याऐवजी आतंकवादी निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, असे होऊ नये याकरिता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तेथील मदरशांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करून सांगू इच्छितो की, संपूर्ण देशातील सर्व मदरशांवर बंदी घालावी, असे आवाहन तेलंगाणाचे भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले. ‘शिवप्रतापदिना’निमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम १२ डिसेंबर या दिवशी पुणे येथील कर्वेनगर मधील ‘जय शिवराय’ चौकात घेण्यात आला. या वेळी सातारा जिल्ह्यातील हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर यांना आमदार राजासिंह ठाकूर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रविण दबडघाव यांच्या हस्ते ‘शिवप्रताप पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
संपूर्ण देशात हिंदु एकता निर्माण करावी ! – विक्रम पावसकर
विक्रम पावसकर यांनी सांगितले की, शिवप्रतापदिन संपूर्ण देशामध्ये साजरा केला पाहिजे. हिंदूंवर अत्याचार करणारे संघटित आहेत; परंतु हिंदू संघटित नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घराघरामध्ये पोचवली पाहिजे आणि हिंदू एकता संपूर्ण देशात निर्माण केली पाहिजे.
हिंदु हा नेहमी विजयाचे प्रतीक ! – मिलिंद एकबोटे
समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे म्हणाले, ‘‘हिंदु हा नेहमी विजयाचे प्रतीक राहिला आहे. ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते हे केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे नाहीत, तर त्यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे ते कोविड योद्धे ठरले आहेत.’’
श्री. महेश पवळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अफझलखान ही केवळ व्यक्ती नसून वृत्ती आहे, ही वृत्ती आजही क्षणाक्षणाला हिंदु धर्म नष्ट करण्याची संधी शोधत आहे. ही वृत्ती ठेचून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण घराघरात दिली पाहिजे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवळे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, श्री महावतार बाबाजी मठाचे मठाधिपती गुरुश्री, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, पतित पावनचे सिताराम खाडे, हिंदुराष्ट्रसेनेचे प्रवीण झेंडे, तसेच अन्य पदाधिकारी आणि मान्यवर या वेळी उपस्थित होते.