चीन नेपाळच्या लुंबिनी शहरापर्यंत रेल्वे आणि रस्ते मार्ग बनवणार !

  • भारतासाठी चीनचा हा प्रयत्न धोकादायक ! – संपादक
  • भारताच्या परराष्ट्रनीतीचा सातत्याने पराभव होत आहे, हेच अशा प्रकारच्या घटनांमधून सिद्ध होते. शेजारी राष्ट्रांना चीन स्वतःच्या मगरमिठीमध्ये घेत असतांना भारत अधिक आक्रमक होत नाही, हे चिंताजनकच होय ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

काठमांडू (नेपाळ) – चीनकडून नेपाळच्या लुंबिनीपर्यंत रेल्वेमार्ग आणि रस्तेमार्ग बनवण्यात येणार असल्याची घोषणा चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी केली आहे.
‘रस्तेमार्ग आणि रेल्वेमार्ग यांच्यामुळे सगळ्या बाजूंनी पर्वतांनी घेरलेल्या नेपाळचा जगाशी संपर्क वाढू शकेल’, असा दावा वांग यी यांनी केला आहे. लुंबिनी हा प्रदेश नेपाळच्या दक्षिण भागात नेपाळ आणि भारत सीमेलगत स्थित आहे. भारताच्या उत्तरप्रदेशातील गोरखपूर शहरापासून हा भूभाग ९५ किमी अंतरावर स्थित आहे. दुसरीकडे म्यानमारमध्येही चीनकडून हिंद महासागरापर्यंत रेल्वेमार्ग सिद्ध करण्यात येत आहे.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, ८०० कोटी डॉलर (६ लाख ८४९ कोटी रुपये) खर्च करून दक्षिण तिबेट ते काठमांडू पर्यंत चीनच्या सीमेपलीकडे रेल्वे बनवण्याची चीनची योजना आहे. यामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला लाभ होणार असला, तरी चीनच्या साहाय्याच्या ओझ्याखाली मात्र या देशाला दबून रहावे लागेल, हे निश्‍चित.