विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गाव यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

पुणे – जागतिक पातळीवर प्रगती करतांना विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गाव यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. देशाच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा. शैक्षणिक प्रगतीला विनयाची जोड दिल्यास आणि आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन स्वीकारल्यास जीवनात चांगले यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापिठा’च्या १८ व्या पदवीदान समारंभप्रसंगी बोलत होते. या वेळी कुलपती, मुख्य संचालिका, प्रभारी-कुलगुरु, कुलगुरु, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विशेष प्रावीण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक आणि विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले; तसेच परिसरात वृक्षारोपणही करण्यात केले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘‘शिक्षण क्षेत्रात संशोधनासमवेत सृजनशीलतेलाही महत्त्व आहे. विद्यापिठाने शैक्षणिक गुणवत्तेसमवेत विद्यार्थ्यांच्या कौशल्याच्या आणि मूल्यांच्या विकासावर भर द्यावा. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषेत देतांना इंग्रजीचेही शिक्षण दिल्यास त्यांचा विकास चांगल्या प्रकारे होईल. विद्यापिठाची पदवी प्राप्त केल्यानंतर स्नातकांना शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रादेशिक भाषेत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञान उपलब्ध करून दिल्यास ती देशाची मोठी सेवा ठरेल.’’

केंद्रीय उच्च शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. ‘साहचर्य आणि स्वावलंबन’ हा विद्यापिठाचा आत्मा असून विद्यापिठाने वैश्विक भावनेचा संदेश देतांना पर्यावरण संवर्धनाकडेही लक्ष दिले आहे, असे कुलपती डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.