कौशल्यपूर्ण आणि तळमळीने सेवा करणारे नंदुरबार येथील चि. राहुल मराठे अन् प्रांजळ, आणि मनापासून साधना करणाऱ्या रामनाथी आश्रमातील चि.सौ.कां. प्रतिभा मोडक !

चि. राहुल मराठे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सौ. निवेदिता जोशी,

सनातन आश्रम, रामनाथी गोवा.

१. सेवेची तळमळ 

अ. श्री. राहुल मराठे यांचा परिपूर्ण सेवा करण्याकडे कल असतो. ते कौशल्याने, भावपूर्ण आणि गुरुदेवांना शरण जाऊन सेवा करण्याचा प्रयत्न करतात.

आ. ते संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला धर्मशिक्षणाची सूत्रे सांगतात. अर्पण मिळवणे, विज्ञापने आणणे आणि संपर्क करणे, या सेवा ते कौशल्याने करतात.

इ. त्यांना पुष्कळ पैसे मिळवण्याचा मोह नाही. केवळ ‘गुरुदेवांची सेवा आणि साधना करता आली पाहिजे’, हाच त्यांचा उद्देश असतो.

२. साधकांना साहाय्य करणे

त्यांना साधकांनी एखादी सेवा सांगितली, तर ‘त्या साधकांना कसे साहाय्य करू शकतो ?’, असा विचार करून ते नियोजन करतात.

३. स्वीकारण्याची वृत्ती

त्यांना सेवेमध्ये काही अडचण असेल, तर ते सद्गुरु जाधवकाकांशी बोलून घेतात आणि त्यांनी सांगितलेले मनापासून स्वीकारतात अन् ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करतात.

४. साधनेत साहाय्य करणारी पत्नी लाभू दे, अशी प्रार्थना करणे

ते ‘विवाहानंतरही स्वतःची साधना चालू राहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांशी रहाता यावे. सेवा आणि साधना यांमध्ये जोडून ठेवणारी सहचारिणी लाभू दे’, अशी प्रार्थना करतात.’

(८.११.२०२१)

कु. भावना कदम, नंदुरबार

१. कर्तेपणा अर्पण करणे

‘राहुलदादा कुठलीही सेवा तळमळीने आणि भावपूर्ण करतात. सेवा झाल्यावर ते ‘गुरुदेवांनी करवून घेतली आणि सहसाधकांमुळे झाली’, असे म्हणतात.

२. आध्यात्मिक त्रासांवर मात करणे

‘आध्यात्मिक त्रासांवर मात करायलाच पाहिजे. त्यामुळे साधनेत अडचण आणि आवरणही येत नाही’, या भावाने ते स्वत: प्रयत्न करतात.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

राहुलदादांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि भाव आहे. ‘माझ्या जीवनात येणार्‍या प्रत्येक संकटात गुरुदेवांनी मला साहाय्य केले आहे. तेच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्याच कृपेने सर्व होते’, असा दादांचा भाव आहे.’

–  (१०.१२.२०२१)

चि.सौ.कां. प्रतिभा मोडक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. सेवेसाठी सतत उत्साही आणि तत्पर असणे

‘कु. प्रतिभाला कोणतीही सेवा सांगितल्यावर किंवा तिचे सेवेत साहाय्य मागितल्यास ती उत्साहाने आणि तत्परतेने सेवा करते. ती आश्रमसेवा, संकलनसेवा, विभागाची स्वछता इत्यादी सेवा मनापासून आणि जलद गतीने करते.

२. प्रांजळपणा आणि मनाचा अभ्यास करणे

एखादा प्रसंग घडल्यास ती त्याविषयी प्रांजळपणे बोलून घेते आणि त्यावर लगेच प्रयत्न चालू करते. बोलतांना ‘तिच्या मनाची प्रक्रिया नेमकी काय झाली ? तिचे कुठे चुकले ?’, हे ती नीट समजून घेते. आपण सांगत असलेले तिच्या लक्षात न आल्यास ते समजेपर्यंत ती परत विचारून घेते.

३. प्रेमभाव

तिचे सर्वांशी आपुलकीने आणि सहजतेने बोलणे अन् वागणे असते. तिच्या निरागस स्वभावामुळे तिची सर्वांशी जवळीक आहे.’

– सौ. निशिगंधा नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (२४.११.२०२१)

१. सेवेशी एकरूप होणे : ‘कु. प्रतिभा सहसाधकांना समजून घेते. ती सेवा करतांना सेवेशी एकरूप होते. मला ‘ई-मेल’ कसे करायचे ?’, हे लक्षात येत नव्हते. त्या वेळी अवघ्या ५ ते १० मिनिटांत तिने मला त्यातील बारकावे समजावून सांगितले.

२. इतरांना आनंद देणे : ती भावी यजमानांकडून आलेला खाऊ सर्व मैत्रिणींना वाटते. यातून ‘इतरांना देणे आणि त्यातील आनंद घेणे’, हे ताईकडून शिकायला मिळाले.

३. भाव : ती शांत स्वभावाची आहे. ‘ती अंतर्मनातून गुरुदेवांशी जोडली आहे’, असे जाणवते. ती म्हणते, ‘‘सेवा आणि साधना करणे आणि गुरुचरणांची प्राप्ती करून घेणे’, हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.’’

– सौ. निवेदिता जोशी, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (८.११.२०२१)

बहुगुणी असे ही सनातनची कन्या ।

श्री. अजित तावडे आणि सौ. अरुणा तावडे

साधी रहाणी अन् विचार साधनेचे ।
प्रतिभा करी पालन नित्य धर्माचे ।। १ ।।

आश्रम असो वा असो घर ।
दायित्वाने सेवा करण्यास असे सदा तत्पर ।। २ ।।

मायेची असे अल्प आसक्ती ।
ओढ तिला अधिक सात्त्विकतेची ।। ३ ।।

कौशल्य असे कलागुणांचे ।
रांगोळी अन् मेहंदी यांतील कलाकुसरांचे ।। ४ ।।

बहुगुणी असे ही सनातनची कन्या ।
शोभून दिसेल ही ‘मराठे’घराण्या ।। ५ ।।

नम्र अन् विनयशील राहुल लाभला जीवनसाथी ।
साधनेत उत्तरोत्तर होवो उभयतांची प्रगती ।। ६ ।।

नित्य लाभो गुरुकृपा साधनामय संसार होऊनी ।
हीच प्रार्थना श्री गुरुचरणी विवाहाच्या या शुभदिनी ।। ७ ।।

– सौ. अरुणा (चि.सौ.कां. प्रतिभाची मावशी) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि श्री. अजित तावडे (चि.सौ.कां. प्रतिभाच्या मावशीचे यजमान), रामनाथी आश्रम, गोवा. (१०.१२.२०२१)

 

त्यागमय जीवन जगता, होईल गुरुरायांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार ।

ही हसतांना पडते गालावर कृष्णाप्रमाणे खळी ।
तेव्हा भासते आम्हा ही गोड चाफेकळी ।
निर्मळ अन् सदानंदी राहून नित्य श्रीहरीस आळवी ।
म्हणूनच गोविंदाने घेतले हिला त्याच्या जवळी ।। १ ।।

दिली देवाने सप्तपदी चालण्या प्रवृत्ती मार्गावरी ।
साधना करता राहुलसंगे मुक्ती मिळेल द्वारी ।
नामाची जोड देऊनी भक्ती करावी अपरंपार ।
अष्टांग साधनेच्या बळावर कर भवसागर पार ।। २ ।।

समजून जीवनाचे सार प्रतिभा, कर तू आध्यात्मिक संसार ।
प्रेमाने मन जिंकावे सर्वांचे, न करावा कधी स्वतःचा विचार ।
त्यागमय जीवन जगता होईल, गुरुरायांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार ।
देहाने नित्य कार्यरत राहून मनाने हो तू ‘निर्विचार’ ।। ३ ।।

आज हिला निरोप देतांना कंठ दाटतो फार ।
जीवनात नित्य नांदो तुझ्या सुख, समृद्धी अन् आनंद अपार ।
आम्हा सर्वांच्या शुभेच्छा अन् प्रार्थनाही गुरुचरणी वारंवार ।
व्हावा तुझा सप्तलोकापर्यंतचा प्रवास अन् उघडावे तुजसाठी मोक्षाचे द्वार ।। ४ ।।

– सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (२४.११.२०२१)

वधू आणि वर या दोघांसाठी उपयुक्त उखाणे

रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून कळवला मनातील हेतू ।
….. चे नाव घेते, गुरुकृपेने साधता येऊ दे हिंदु राष्ट्राचा सेतू ।